सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर


[ सदर विषयास प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, या लेखातील किंवा लेखमालेतील अन्य कोणत्याही भागामध्ये केलेला, *अस्पृश्य किंवा पूर्वास्पृश्य* असा उल्लेख हा त्याकाळातील प्रचलित संकल्पनांना अनुसरून केलेला असून, स्वातंत्रोत्तर काळामध्ये संविधानात नमूद केल्याप्रमाणे, आता कोणीही अस्पृश्य नाही. आमची देखील हीच धारणा आहे. केवळ हिंदूच नव्हे तर विश्वातील कोणताही मनुष्य, जात, वर्ण, वंश, धर्म वा अन्य कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक कारणाने आमच्यासाठी अस्पृश्य नाही. ]

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील अंदमानपर्व संपतानाच रत्नागिरीपर्व सुरु होते, अंदमानमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी तिथे इस्लाम, राजकारण, समाजकारण याबद्दलची मुस्लिम मनोवृत्ती आणि त्याचप्रमाणे स्वदेश, स्वधर्म आणि स्वधर्मीय याबाबतच हिंदूंची मानसिकता या बाबींचा अनुभवाने अभ्यास आणि विश्लेषण केले.

याच कालावधीमध्ये त्यांचा ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ देखील लिहून पूर्ण झाला. “सावरकरीय हिंदुत्व” याबद्दल पुढील भागातून आपण माहिती घेणारच आहोत. परंतु, त्या हिंदुत्वातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे हिंदूसंघटन आणि हिंदू संघटनातील महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी चालवलेली ‘अस्पृश्योद्धार चळवळ’ होय. याच अस्पृश्योद्धार चळवळीमागची सावरकरांची भूमिका आणि कार्य याविषयी आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत.

१९३७ साली कर्णावती येथील आपल्या अध्यक्षीय भाषणाच्यावेळी सावरकर सांगतात;               

“…कोणताही हिंदू, हिंदू म्हणून स्वतःशी जितका प्रामाणिक असेल, तितकाच हिंदी राष्ट्राशी प्रामाणिक राहिल्यावाचून त्याला गत्यंतर नाही…”

या वाक्यातील पहिला भाग महत्वाचा आहे, तो म्हणजे कोणताही हिंदू, हिंदू म्हणून स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे. हिंदूने स्वतः शी प्रामाणिक असणे म्हणजे नेमके काय? तर, “तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू” या उक्तीप्रमाणे प्रत्येक हिंदूने अन्य हिंदूबद्दल मग त्याची जात, वर्ण, वंश, भाषा, प्रांत एवढेच नव्हे तर देश कोणताही असो, बंधुत्वाचेच नाते जोपासले पाहिजे. परंतु तत्कालिन समाजस्थितीमध्ये हिंदूंमधील जातीभेद हा शिगेला पोहोचला होता, आणि त्याचाच फायदा घेऊन हिंदूंचे रितसर धर्मांतरण करण्याचा खेळ खेळला जात होता.

अधिक वाचा  आधुनिक वाल्मिकी... ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती।।’

अश्या धर्मांतरणामधून स्वकीयांना त्यांची संस्कृती, परंपरा आणि पर्यायाने स्वदेश यांच्या अभिमानापासून दूर नेण्याचा डाव मांडला होता. त्यामुळे सकल हिंदूंमधील जे काही जातीय, वंशीय, वर्णीय अंतरे, दुरावे आहेत त्यांच्या भिंती पाडून त्यांना केवळ ‘हिंदू जगत’ याच संज्ञेखाली आणून एकसंध, एकजीव करणे हे समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताचे होते. दुसरे असे की, यामध्ये उघडपणे राजकारणात भाग न घेण्याच्या अटीचे बंधनही लागू पडत नव्हते. त्यामुळे, राष्ट्र कार्य करण्याच्या उद्देशाने करून घेतलेल्या सुटकेचा उद्देश सहज सफल होणार होता.

काही महाभाग, सावरकरांच्या अस्पृशोद्धार चळवळीस, रिकामपणाचे उद्योग असे म्हणतात, तर काही अतिशहाणी मंडळी अन्य पर्याय नसल्याने केलेली चळवळ असेही म्हणतात. त्यामुळे सावरकरांची अस्पृश्योद्धार चळवळ हे राष्ट्रीय कार्य मानता येणार नाही असाही एक सूर आळवणारी काही पत्रकार, लेखक मंडळी दिसतात. जर अस्पृश्योद्धार चळवळ हे राष्ट्रीय कार्य नसेल तर, म. गांधी,  डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, म. फुले  यांचे अस्पृश्योद्धार चळवळी संबंधातले कार्य राष्ट्रीय नव्हते असे समजता येईल का? हा प्रश्न आहे.

सावरकरांची अस्पृश्योद्धार चळवळीमागची मनोभूमिका त्यांच्या ‘हिंदुत्वाचे पंचप्राण’ या ग्रंथातील एका प्रकरणातून स्पष्ट होते. त्या प्रकरणाचा सारांश खालील प्रमाणे;

अस्पृश्योद्धाराचाच प्रश्न घ्या; हे सात कोटी आपले हिंदू रक्ताचे, धर्माचे, राष्ट्राचे बंधू यांस आपण, तो अब्दुल रशीद, तो औरंगझेब, ते पूर्व बंगालातील हिंदूंच्या कत्तली करणारे इतर विधर्मीय, धर्मोन्मत्त यांना जितके जवळ करतो, त्यांना जसे आणि जितके जेथपर्यंत घरात येऊ देतो तेथपर्यंत आणि तसे देखील वागवीत नाही. ते धर्मशत्रू घरात आले असता त्यांस तुम्ही गादीवर बसवून “या खानसाहेब” म्हणून मांडीशी मांडी लावली असतीत. पण जरी आपल्यातील अस्पृश्य हिंदूतील अगदी संत, सालस, सरळ, विठोबाचे वारकरी, स्नान करून घराशी आला तरी त्याला आत घेणार नाही, त्याची सावली देखील घेणार नाही!त्यांच्यावर जो आपण अमानुष बहिष्कार टाकला त्यामुळे ते आपल्या उपयोगी पडत नाहीत, उलट शत्रूस आपल्या घरात भेद पडण्याला सुलभ साधन होतात अंती बाटून आपलेच शत्रूच होऊन आपल्या अपरिमित हानीस कारणीभूत होतात. ह्यासाठी आणि *विशेषतः न्यायासाठी* जर त्यांस त्यांचे मनुष्यत्वाचे अधिकार आपणहून त्यांना देऊ केले तर हिंदूंवर आघात करण्यासाठी विधर्मींनी उचललेल्या भ्रष्टीकरणाच्या तरवारीची धार आपोआपच बोथट होईल.”

सावरकरांच्या या उताऱ्याचा काहीजण चुकीचा अर्थ लावताना दिसतात. त्यांच्या दृष्टीने, सावरकरांची अस्पृश्योद्धार चळवळ ही केवळ एक राजकीय बलसंवर्धनासाठी होती असे म्हटले जाते. संख्याबलाच्या दृष्टीने जरी या चळवळीचा विचार केला तरी ती राष्ट्र हिताचीच ठरते असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण जेंव्हा हिंदूंचे धर्मांतरण होते, विशेषतः परकीय धर्मामध्ये त्यांचे धर्मांतरण होते तेंव्हा, त्या व्यक्तीची राष्ट्रीय आस्था संपते. त्याकाळी होणारी धर्मांतरणे ही हिंदूंचा मुसलमान किंवा हिंदूंचा ख्रिश्चन अशीच होत असत. ज्या परिस्थितीमध्ये धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी किंवा फाळणीचे बीज रोवले जात होते तेंव्हा प्रांतोप्रांती असणारे हिंदूंचे संख्याबल शाबूत राखणे ही राष्ट्राच्या एकसंधतेच्या दृष्टीने आवश्यक बाब होती हे समजून घेतले पाहिजे.

अधिक वाचा  मानवसेवेची प्रेरणा देणारे संत सेवालाल

धर्मांतरणाच्या बाबतीत डॉ.आंबेडकरांचे विचार, भूमिका नेमकी काय होती ते पाहुयात,

आपण बौद्ध धर्मच का निवडला? याबद्दल ५ ऑगस्ट १९५६ रोजी आपल्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात;

“मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म आपणाला कदाचित फायदेशीर होतील, पण ते भारतीय धर्म नाहीत, त्या  धर्माचा स्वकार केला तर आपणाला इतर देशातून, आपल्या लोकांच्या भौतिक उन्नती करता पुष्कळ पैसाही मिळेल, आपणाला भारतीय राजकारणात खूप बळही मिळवता येईल. पण या साऱ्या गोष्टी आपणाला परस्वाधीन होऊन करता येतील. दुसऱ्यांच्या ओजळीने, दुसऱ्यांचे पाणी पिऊन आपल्या प्रगतीची तहान भागवणे हा पुरुषार्थ नव्हे. स्वतःच्या हिमतीने, स्वावलंबनाने व स्वाभिमानाने आणि स्वदेशी नव्या धर्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ ठरेल आणि भारतीय इतिहासात आपला पुरुषार्थ सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. ख्रिस्ती अगर इस्लामी धर्माने भारतीय संस्कृती नष्ट होईल.” [ खैरमोडे खंड १२,  पृ. २५ ]

याचाच अर्थ, सावरकरांची अस्पृश्योद्धार चळवळ ही, हिंदू जगतामध्ये त्यांना मानाचे स्थान देण्यासाठी, त्यांना परधर्मात जाण्यापासून रोखण्यासाठी आणि पर्यायाने अश्या धर्मांतरणाने भारतीय संस्कृतीचा होणारा ऱ्हास टाळणारी होती.  

अधिक वाचा  होय,अण्णा हजारे चुकलेच.....

असा दूरगामी विचार मनात ठेवून, उदात्त हेतूने चालवलेल्या चळवळीद्वारे अनेक सहभोजने, महिलांसाठी अखिल हिंदू हळदी-कुंकू समारंभ, एकत्रित चहापान, पूर्वास्पृश्यांची उपाहारगृहे, बॅण्डपथक, गादीकारखाने आदी व्यवसायांची निर्मिती, पूर्वास्पृश्यांचे मौजीबंधन करून त्यांना वेदोक्ताचे अधिकार देणे, पूर्वास्पृश्यांना शेकडो मंदिरांतून मुक्त प्रवेश देणे, आरंभीपासून  समस्त हिंदू समाजाला मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती करणे, पूर्वास्पृश्यांना स्पृश्यांच्या शाळेतून प्रवेश देणे आदी आणि अश्याच प्रकारची कार्ये सावरकरांनी इ. स १९२४ ते १९३७ पर्यंत म्हणजे तब्बल १४ वर्षे स्थानबद्धतेत असताना केली.

त्यांच्या या कार्याचा गौरव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर वि. रा. शिंदे, शेठ भागोजी कीर आदी अस्पृश्योद्धारासाठी झटणाऱ्या प्रमुख नेत्यांनी केला होता.

आपल्या या ‘रत्नागिरी पर्वा’बद्दल स्वतः सावरकर म्हणतात. “हिंदूंनी एकवेळ माझी मार्सेल्सची मारलेली उडी विसरली तरी चालेल, पण माझे रत्नागिरीतील कार्य त्यांनी सदैव लक्षात ठेवावे आणि अमलात आणावे.”

तथापि वि. दा. सावरकर हे व्यक्तिमत्व समजून घेताना त्यांच्या ‘रत्नगिरी पर्वा’चा आणि मुख्यत्वे ‘अस्पृश्योद्धार चळवळी’चा विचार आणि त्यानुसार आचार, प्रत्येक सावरकर प्रेमींनी करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तूर्तास लेखणीला विराम देतो.

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

       प्रवर्तन प्रतिष्ठान पुणे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love