गुढी उभारू आनंदाची,समृद्धीची आणि आरोग्याची..

लेख
Spread the love

शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा.सातवाहन राजा शालिवाहन याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली.प्रत्येक शालिवाहन शकाला विशिष्ट नाव असते.दर ६० वर्षांनी नावाची पुनरावृत्ती होते.

“ वेदांग ज्योतिष” या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी तसेच अनेक शुभ कामांचा शुभारंभ केल्या जातो.दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. तसेच गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे तसाच तो ‘तोरण’ म्हणुनही संबोधल्या जातो.

गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

तसेच संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये सुध्दा गुढी चा संर्दभ घेऊन उल्लेख केला आहे.तसेच, संत नामदेव,संत जनाबाई आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा)  यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात.

संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात “टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची”.

१६व्या शतकातील संत एकनाथांच्या धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात.

अर्वाचीन साहित्यात तर कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेतून गुढीपाडव्याचे अत्यंत रेखीव प्रकारे वर्णन करतांना आढळतात.

 तसेच या दिवसाचे  आरोग्यदृष्ट्या महत्त्व सुध्दा आहे.जसे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.म्हणुन गुढी ऊभारतांना सुध्दा कडुनिंबाची पाने लावतात.

तसं पाहील तर आपल्या प्रत्येक सणांनमध्येच निरोगी राहण्याच सुत्र दडलेल आहे.हे आपल्या संकृतीच प्रतीक तर आहेच त्या शिवाय पुर्व कालापासून सुरू असलेल्या परंपरे मधल्या पावित्र्याची सुध्दा अनुभुती देतात.

पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच आहे.

आपण हे जाणतोच की,जगभरात करोना विषाणूनं हाहाःकार माजवल्यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिस्थितीचं गांभीर्य जाणून घेऊन आपणही सगळेच घरीच राहून यंदाचा गुढीपाडवा २०२१ एका वेगळ्या पद्धतीनं साजरा करावा आणि कोरोनाचा प्रसार रोकण्यासाठी सरकारी नियंमांचे पालन करूया. तसेच या नवीन वर्षात भारत आणि संपूर्ण जग करोना विषाणूपासून मुक्त व्हावं अशी मंगल कामना ही करूया.

स्वलिखित काव्यांने समारोप करते.

 कोविड १९ आला ..

सगळ्यांना त्रास झाला ..

नाही पाहिले त्याने गरीब-श्रीमंत

सगळ्यांना बसवीले एकाच पंक्तीला..

श्वासाच आणल दुखणं

सांगितलं पर्यावरण जपायला..

लॅाकडाऊन मुळे सगळ्यांचे झाले हाल

सांगीतल माणुसकी जपायला..

पैसा,घर,जमीन नाही याला किंमत

सांगीतल जीव जपायला..

सुरू झाली लसिकरण मोहिम

अबाल वृध्द लागले रांगा लावायला..

सगळे जग आहे चिंतेत

सगळ्यांचे आरोग्य लागले पणाला..

विसरून सारे काही आता

गुढी उभारू आनंदाची,समृद्धीची आणि आरोग्याची

—————————————————

सौ.प्रणिता अ.देशपांडे

द हेग,नेदरलॅंडस

Email I’d – [email protected]                                                                             

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *