Responsible नाती…

लेख
Spread the love

कौटुंबिक नाती, वैवाहिक जीवन व जबाबदार पालकत्व या विषयाच्या अनुषंगाने जवळ जवळ दोन दशकांहुन अधिक काळ मी चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा इ.चे आयोजन प्राधान्यक्रमाने करीत आहे. मात्र या विषयासह आता ‘जबाबदार विवाह’ या विषयाच्या अनुषंगाने ही सकस चर्चा व भरीव काम होणे गरजेचे वाटू लागले आहे.

भावी पिढी संस्कारित, सज्जन व सकारात्मक विचारसरणीची व्हावी याकरिता कुटुंब व्यवस्था मजबुत व क्रियाशील असणे गरजेचे असते.  मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढही कुटुंबातच योग्य तऱ्हेने होवू शकते हे अनेक अभ्यासातून वारंवार सिद्ध झाले आहे.

कुटुंब ही मुलांची पहिली ‘शाळा’ असते व मुले अनेक गोष्टी याच शाळेत शिकतात. भावी आयुष्यातील अनेक प्रश्न, समस्या मुले कुटुंबातील संस्कार व शिकवणीतून सोडवितात. मात्र आज कुठेतरी कुटुंब संस्था धोक्यात येताना दिसत आहे.

एका छताखाली भावनिक, मानसिक, समाजिक, आर्थिक व शारिरीक गरजा भागविणारी ही संस्था कुठेतरी आपले महत्व गमवू लागली आहे आणि त्यामुळेच कुटुंब संस्थाही धोक्यात येत आहे. विवाह टिकले तर विवाह संस्था टिकेल. अर्थातच याची पुर्णता जबाबदारी पति पत्नीवर असते. हे नाते टिकविण्याकरिता दोघांची सहमती व सहभाग आवश्यक असतो. प्रत्येकी ५०% नव्हे तर दोघांचाही १००% सहभाग म्हत्वाचा. मात्र भारतीय संस्कृतित विवाह हा दोन कुटुंबांमधे होत असल्यामुळे विवाह बंधनातून पुढे प्रपंच व आनंददायी सहजीवन संबंधित जोडप्यास लाभावे याकरिताही नवविवाहीत दाम्पत्यास कुटुंबियांनी सहकार्य, मार्गदर्शन करणे महत्वाचे असते.

वैवाहिक जीवनात बेबनाव होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र हया बेबनावांवर वेळीच तोडगे काढल्यास सर्वच नात्यांमधील कटुता नियंत्रित करता येते. यात दोन्ही कडच्या कुटुंबियांची भुमिका महत्वाची ठरते.

त्यामानाने हल्ली विवाह खुप उशीरा होतात. मुली शिकतात, नोकरी करियर करतात, आर्थिक स्तरावर आत्मनिर्भर होतात व त्यानंतरच विवाहाचा विचार करतात. थोडक्यात काय तर हल्लीची नवरी ही परिपूर्ण व अनेक अंगांनी सक्षम असते. तिचे विचारही पक्के असतात व विवाहकडे बघण्याची तिची स्वतःची एक तयार दृष्टी असते. त्यामुळे आता पारंपारिक दृष्टीकोनातून विवाहाकडे बघण्यामुळे गल्लत होवू लागली आहे. काळ झपाटयाने बदलत आहे हे विसरून चालणार नाही. पारंपारिक सुनेच्या भुमिकेत ती दिसेलच याची आता शाश्वती नाही. नोकरीच्या वेळा, कामातील टेंशन्स्, विवाह व कुटुंबातील समायोजन याकरिता तिला वेळ देणे आवश्यक आहे.

जी कुटुंबे या नवरीला या सगळ्यात वावरताना ‘सहजता’ उपलब्ध करून देतात तिथे सौख्य नांदते व हीच नवरी पुढे कुटुंबातील सौख्याचे केंद्रस्थान होते. मात्र, या स्वतंत्र व्यक्तीमत्वाला योग्य त्या सन्मानाने वागविले न गेल्यास अथवा तिच्या गरजा दुर्लक्षित केल्यास कौटुंबिक अपघात होता व अनेकदा त्यातील नात्यांना जबर दुखापतही. आपल्या घरी आलेली ती मुलगी आपल्या मुलाची आयुष्यभराची सहचारिणी असते. त्यामुळे त्यांचा प्रपंच व सहजीवन दोघांनाही जीवनाच्या सर्व  त्रुतूंमधे एकत्र बांधुन ठेवणारे असावे. या दृष्टीने कुटुंबियांचे प्रयत्न होणे याला अन्यय साधारण महत्व आज प्राप्त होत आहे.

विवाहाने फक्त भावनिक, शारीरिक, सामाजिक संबंध निर्माण होत नाहीत तर ते एक कायदेशीर बंधनही असते. त्यामुळे अत्यंत डोळसपणे जोडीदाराची निवड करणे हे ही तितकेच महत्वाचे. हल्लीची पिढी सहजीवनास उत्सुक आहे मात्र निवड चुकल्यास पुढील कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार नाही. यातून ही पिढी आज मोठया प्रमाणात ‘लिव्ह इन रिलेशन’ चा मार्ग स्विकारत आहे. विवाह व कुटुंब संस्थेकडे या संकल्पनेमुळे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे व ओघाने सामाजिक प्रश्नही वाढत आहेत. मात्र आजही विवाहास अधिक पसंती आहे हे त्यातील महत्वाचे सुत्र आहे.

विवाह संस्थेला पर्याय म्हणुन अनेक प्रयोग पुढे आले, अगदी स्वतःशीच विथीवत विवाह करणे हा देखिल प्रयोग होत आहे.  मात्र या सगळ्या पर्यायात विवाहाची सर्वच उद्विष्टे पूर्ण होत नाहीत. म्हणुन विवाह करून कुटुंब निर्मिती करण्यास उत्सुकांची संख्याही कमी नाही. मात्र दरवर्षी होणारे विवाह व कोर्टाची पायरी चढणारी जोडपी पाहता, एका वेगळ्या विचाराने आपल्याला पालक म्हणून काम करावे लागणार आहे हे निश्चित. एक लग्न मोडणे म्हणजे तारुण्यातील किमान ५ ते १० वर्षं कमी होणे असे गणित असते. याचा व्यक्तीगत, व्यवसायिक व कौटुंबिक जीवनावर होणारा विपरित परिणाम वेगळाच. यातून होणारे भावनिक, मानसिक शारीरिक नुकसान ही खुपच. त्यात या विवाहातून अपत्ये असल्यास त्यांची फरफट व प्रश्नही वेगळेच.

आपण कुटुंबात मुलांची समज जशी वाढते तसे तसे त्यांना जीवन कौशल्ये व संबंधीत वयातील जबाबदाऱ्या व भूमिकाही शिकवितो. तसेच मुले विवाह योग्य होताच त्यांना ‘वैवाहिक जीवनातील भूमिका व जबाबदाऱ्या’ याबद्दल शिक्षण देणे व विवाह आनंददायी व एकमेकांना पुरक ठरत उभयतांना स्वतंत्ररित्या बहरण्यास अनुकुल वातावरण देणारी घटना आहे हे त्यांच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे.

“आज नीट शिकलास तर उद्या उज्वल भवितव्य असेल” असे सर्वच पालक मुलांना सांगतात तसे “विवाहानंतर बदलणाऱ्या भूमिका व जबाबदाऱ्या नीट पार पाडल्यास तर वैवाहिक आयुष्यही समृद्ध होईल” हे देखिल भावी पीढीला सांगणे आज गरजेचे आहे. थोडक्यात विवाहापुर्वी (pre marital counseling)याचीही पुर्व तयारी करून घेणे महत्वाचे आहे.

आज वाढीस लागलेली स्वकेंद्रीत, भोगवादीवृत्ती देखिल वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मोठा अडसर उभा करत आहे. विवाहाचा महत्वाचा गाभा समर्पण, त्याग व समायोजन आहे हे विसरून चालणार नाही.*

मुले अनुकरणप्रिय असतात, पालकांच्या सवयी, दृष्टीकोन, वृत्ती व नाती हाताळण्याचे कसब ते पाहात असतात. आई वडीलांची एकमेकांशी वागण्याची पद्धत, नात्यातील आदर, प्रेम, निष्ठा, विश्वास, सेवाभाव हे सगळे त्यांच्या मनावर कृतितून कोरले जात असते. सकस व सुट्ठड वैवाहिक संबंध त्यातून निर्मित कुटुंब, सर्व  प्रकारचा आधार व सामाजिक प्रतिष्ठा देणारे हे नाते, मुलेही बघत असतात व प्रत्यक्ष पाहिलेले असल्यामुळे योग्य वेळी निभावितातही. विवाह संस्थेबद्दल आदर व त्यावर विश्वास ही या निमित्ताने वाढीस लागतो. पालकांनी चांगले ‘रोल मॉडेल’ होणे ही देखिल आजची गरज आहे.

पति पत्नीचे सहजीवन संवादातून, एकमेकांचे करण्यातून, काही प्रसंगी त्यागातून, एकमेकांना आधार देत आनंदी व समृद्ध होते. हे नाते फुलायला वेळ व १०० % समर्पण दयावे लागते. ( अगदी प्रेम विवाह असला तरीही) एकमेकांची ओळख होणे, गुणदोष समजून एकमेकांना स्विकारण्याची प्रक्रिया म्हणजे सहजीवन परंतू भौतिक गोष्टीत आनंद व सहजीवन शोधणारी जोडपी एकमेकांच्या सहवासातील आनंदाचा अनुभव घेण्याचे विसरून जातात. लग्नाचा हॉल, मेनू, फोटो, दागिने, कपडे, हनिमुन सगळ्यावर चर्चा होते मात्र विवाहानंतर प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या, विवाहानंतर बदलणारी भूमिका व विवाह निभाविण्याकरिता घ्यावे लागणारे कष्ट या वर संवाद राहुन जातो व पदरी पडते निराशा व अपेक्षाभंग.

कुटुंबातून विवाह संस्थेबद्दल योग्य तो आदर, गांभीऱ्यासह  बदलत्या काळातील विवाह संस्थेसमोरील आव्हाने व ती पेलण्याचे कसबही भावी पीढीला शिकवावी लागणार आहेत.

असे म्हणतात marriage is an  empty box, it’s up to you how you fill it… त्यामुळे पतिपत्नीने टीम म्हणुन हा डबा आनंद, सुख, मैत्री, संवाद, सहवास, सेवाभाव याने भरायचा असतो. आज नेमके हेच विसरले गेले आहे.

भावी पीढीला विवाह करायचा आहे, एकाच नात्यास संपूर्ण आयुष्यही घालवायचे आहे त्याकरिता भौतिक अंगiने तयारीही खुप करतात मात्र प्रत्यक्ष ते नाते निभाविताना हा उत्साह का गळुन पडतो?. स्मार्ट जगातील स्मार्ट मुलांना सगळे झटपट हवे असते, न मिळाल्यास त्यांच्याकडे प्लॅन बी तयार असतो. परंतू स्वतःवर काम करण्याची तयारी नसते. तडजोड, माघार घेणे, समायोजन, त्याग, दुर्लक्ष,अनुभुति, सयंम, सेवाभाव अशा कितीतरी गोष्टींची नव्याने ओळख करून घेणे व दैनंदिन जीवनात वापरण्याची गरज आज या पीढीला आहे. स्वतःवर काम न केल्यामुळे आपल्या आयुष्यातील काय हरविले आहे हे या पिढीला फार उशिरा कळते व दुर्दैवाने तोवर खुपच उशिर झालेला असतो.

चला तर मग, थोडेसे डोळस काम घराघरातून विवाह व कुटुंब संस्थेच्या मजबुतीकरणाकरिता करू. या स्मार्ट व आभासी जगात अधिक वावर असणाऱ्या पिढीला सकस, खरी व तरल नाती, कुटुंबातील जीवाचे माणुस यांची ओळख करुन देवू अन्यथा या आभासी दुनियेतील जागतिक दिन साजरे करण्याकरिताही त्यांच्याकडे ही नाती उरणार नाहीत.

स्मिता कुलकर्णी

ज्येष्ठ समुपदेशक

९८२२७५२०५६

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *