पुणे–भोंग्यांवरून महाराष्ट्रात राजकीय वाद रंगला आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. याचा भविष्यात राजकीय परिणाम काय व्हायचा तो होईल. मात्र व्यावसायिक परिणाम मात्र आताच दिसू लागला असून, भोंग्यांच्या विक्रीमध्ये पुणे शहरात तब्बल २५ टक्के घट झाली आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यवसायिकाने सांगितले की, मागील काही दिवसांपासून पोलीस सातत्याने दुकानात चौकशी करण्यास येत आहेत. कोणी बल्कने भोंगे विकत घेतले आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. विशेष करून औरंगाबाद येथून खरेदीसाठी कोणी आले होते का, याचीही विचारणा होत आहे. आमच्या दृष्टीने ग्राहक हा ग्राहकच असतो, त्याला जात धर्म नसतो. मात्र पोलिसांचा नाहक ससेमिरा आमच्या मागे लागला आहे. राजकीय वादामुळे नव्याने भोंगे विकत घेण्यास ग्राहक तयार नाहीत. काही धार्मिकस्थळांनी आम्ही आतल्या आत स्पिकर लावून प्रार्थना करण्याची भूमिका घेतली आहे. याचाच विक्रीवर परिणाम झाला आहे.
वर्षभर भोंग्यांची विक्री होत असते. सर्व समाजातील नागरिक भोंग्यांची खरेदी करतात. विशेषत: रमजान महिन्यात भोंग्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मशिदींवरील भोंगे दुरुस्तीकरणे किंवा नवीन भोंगे बसवणे अशी कामे मिळतात. मागील दोन वर्षे करोनामुळे व्यवसायाला फटका बसला होता. आताही राजकीय परिस्थिती लक्षात घेता भोंग्यांची विक्री २५ टक्क्यांनी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शहरात विविध धार्मिकस्थळांवर परवानगीशिवाय ९८९ भोंगे लावण्यात आले असल्याचे पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या सर्वेक्षणातून बाब समोर आली आहे. तर, दुसरीकडे १ हजार १०१ भोंगे हे रितसर परवानगी घेऊन लावले आहेत. काही धार्मिक स्थळांवर एकपेक्षा जास्त भोंगे असतात त्यात काहींची परवानगी घेतलेली असते तर काही अनधिकृत असतात. पुणे पोलिसांनी हद्दीतील १७८४ धार्मिक स्थळांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, पोलिसांकडून आता अनधिकृत लाऊडस्पीकर असलेल्या आस्थापनांना भेट देऊन त्यांना परवानगीसाठी अर्ज करण्यास किंवा भोंगे काढून टाकण्यास सांगण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.