सावरकर समजून घेताना -भाग २ वि. दा. सावरकर – माफीवीर की राष्ट्रवीर (उत्तरार्ध):


अंदमानात गेल्यावर सावरकरांचे मनोबल खचले आणि त्यातूनच अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत असा दावा काही नतद्रष्ट लेखक, पत्रकार करतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मनोबल अखेरपर्यंत कसे शाबूत होते हे त्यांच्याबरोबर शिक्षा भोगणाऱ्या, सच्चिदानंद संन्याल, उल्हासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा या विविध प्रांतातील कैद्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. लेखनविस्ताराच्या भयास्तव त्यातील उतारे इथे देत नाही.

हे झाले इतरांचे सावरकरांबद्दलचे मत, पण स्वतः सावरकरांची नेमकी मनोवस्था काय होती हे त्यांनी आपले बंधू नारायण सावरकर यांना, अंदमानहून लिहिलेल्या पत्रामधून समजते. त्या पत्राची थोडक्यात पार्शवभूमी अशी;

१९२० साली, देशभरातून अंदमानातील सर्वच राजबंद्यांच्या सुटके करता लक्षावधी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे एक आवेदन पत्र ब्रिटिशांना सादर करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून ब्रिटीश सरकारने अनेक राजबंद्यांची सुटका केली होती, अर्थातच सावरकर बंधूंची सुटका केली नाही. त्याबद्दल सांगताना सावरकर लिहितात,

“… निदान त्या अर्जाने राजकीय बंद्यांची आणि त्यामुळे ज्या कार्यासाठी ते लढले व हरले, त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढेल. …जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेबाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हाला या कोठडीत खितपत पडावे लागत असले तरी आपल्या सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणाऱ्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हाला वाटतात; आणि त्यामुळे गेली आठ वर्ष इथे आणि इतरत्र संप, पत्रे, अर्ज यांच्याद्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली त्याचे आम्हाला फळ मिळाल्याचे समाधान वाटते. राज्य क्रांतिकारकांच्या संघात ज्यावेळी मी काम करत होतो, त्यावेळी माझे विचार जसे होते, आता चार भिंतीच्या आत कोंडल्या गेल्यानंतर काढल्या गेलेल्या १२ वर्षानंतर माझे विचार तसेच आहेत.”

१२ वर्षांनंतरही माझे विचार तसेच आहेत असे सांगणाऱ्या सावरकरांचे मनोबल खचले होते असे म्हणणे हास्यास्पद तर आहे परंतु बालिशपणाचे आणि मूर्खपणाचे आहे असेच म्हणावे लागेल.

अधिक वाचा  स्त्री लेखिकांची खंडित परंपरा पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई

या पत्राचा मजकूर दै. मराठामध्ये २५ जानेवारी १९२० ला छापून आल्याची पोलीस नोंद आहे. म्हणजे, अखेरपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले विचार, तत्व आणि ध्येय-धोरणे बदलली नाहीत हेच त्यातून सिद्ध होते.

या पत्राचा बारकाईने विचार केल्यास, मागच्या आठ वर्षात त्यांनी केलेल्या चळवळीचा पुनरुच्चार करताना सावरकर दिसतात.

याचा अर्थ सावरकरांना; अंदमानमध्ये संघर्ष, चळवळी कराव्या लागल्या होत्या आणि सुख-सुविधा मिळत असताना चळवळी कराव्या लागतात का? याचा विचार वाचकांनी स्वतःच करून पाहावा.

आता जर सावरकरांचे इंग्रजांसोबत साटेलोटे असते तर, अश्या चळवळी कराव्या लागल्या असत्या का? याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे सावरकर इंग्रजांना सामील होते किंवा, ते त्यांच्या कृपाशिर्वादावर राहत होते हा प्रचार किती खोटारडा आणि फसवा आहे स्पष्ट होते.

अंदमानातून सुटका या विषयावरील, सावरकरांच्या माझी जन्मठेप या ग्रंथातील त्यांचे विचार खालील प्रमाणे आहेत…

 “कारागृहात राहून ज करता येत आहे त्याहून किती तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल, अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताच्या दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.”

 “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोट वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती.”

कारागारय अन्वेक मंडळा’पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली भूमिका :

अधिक वाचा  सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.”

एकंदरीतच काय तर; सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यं त्यजति पंडित:।

या संस्कृत वचनानुसार, सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो.

सावरकरांनी राजकारणाचा त्याग करून, समाजकारणाच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा सुवर्णमध्य काढून, आपल्या ध्येयाकडे जाणारे अडकलेले पाऊल मोकळे करून घेतले होते.

वरील सर्व माहितीद्वारे एकच निष्कर्ष निघतो की; सावरकर माफी मागून नव्हे तर, इंग्रजांशी करार-मदार करून मुक्त झाले होते. आणि हा करार काही स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता केलेला नव्हता तर राष्ट्रसेवा करण्याची जास्तीत जास्त संधी मिळवणे हाच उद्देश त्यामध्ये होता हे स्पष्ट होते.  

अधिक वाचा  सावरकर समजून घेताना : भाग ५ वि. दा. सावरकर : हिंदुत्ववादी की राष्ट्रवादी

अखेर त्यांच्या खटपटीला यश येऊन त्यांना रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये पाठवण्यात आले तेव्हा दोनच प्रमुख अटी होत्या,

१) राजकारणात भाग न घेणे. २) रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारांच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर ना जाणे.

यामध्येही कुठेही शरणागती नाही, हा एक प्रासंगिक करार आहे, एका अर्थाने तह आहे.

कधी कधी सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या महाभागांना विचारावं वाटतं,

१) इतर राजबंद्यांसोबत त्यांची मुक्तता का केली नाही?

२) खडाबेडी, एकांतवास कोठडी, कोलू चालवणे इ शिक्षा अंदमानमध्ये का झाल्या ?

३) रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्याऐवजी, इंग्रजांनी त्यांना संमिश्र मंत्रिमंडळात का सामावून घेतले नाही?

४) लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आदी निःसंशय देशभक्त असणाऱ्या मंडळींनी सावरकरांची सुटका व्हावी यासाठी सरकारवर का दबाव आणला?

५) लक्षावधी भारतीयांनी त्यांच्या सुटकेकरता स्वाक्षऱ्या का दिल्या ?

६) सावरकरांच्या मृत्यू पश्चात (१९६६), वैचारिक दृष्ट्या सावरकरवादाशी सहमत नसणाऱ्या नामवंत काँग्रेसी पुढाऱ्यांनी त्यांना क्रांतिकारकांचे अग्रणी, स्वातंत्र्य-योद्धा, साहसी असे संबोधन देऊन श्रद्धांजली का वाहिली? याबद्दल अधिक माहितीसाठी https://shripadramdasi.blogspot.com/2019/02/blog-post.html या आमच्या ब्लॉगवरील लेख वाचावा.

सावरकरवाद्यांच्या सांगण्यावरून नाही तर त्रयस्थपणे वाचकांनी, सावरकरांचा ‘माझी जन्मठेप’ हा ग्रंथ जरूर वाचावा आणि स्वतः च ठरवावे वि. दा. सावरकर : माफीवीर की राष्ट्रवीर ?

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

प्रवर्तन प्रतिष्ठान पुणे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love