विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे-राज ठाकरे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे अशी हाक व आवाहन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी आयोजित या परिसंवादामध्ये राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी खच्चून भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये युवक-युवतींसह साहित्यप्रेमी रसिकांनी गर्दी केली होती.

व्यंगचित्रकाराला एखादी व्यक्ती मग ती राजकारणातील असो किंवा बाहेरची. त्याच क्षणी त्यांचा हात व डोक्यातील ब्रश घंटीसारखा वाजतो. सध्याच्या राजकारण्यांना बघून मंदिरातला घंटा एकाचवेळी वाजण्यात अशी स्थिती असल्याचे भाष्य ठाकरे यांनी यावेळी केले.

 चित्रकला, व्यंगचित्रकला, या प्रश्नांवरून सुरु झालेल्या प्रश्नांचा प्रवास राजकीय विषय तसेच मधल्या काळातील राजकारणात घडलेल्या घटना, घडामोडींना स्पर्श करीत अनेक विषयांवरची आपली मते बेधडकपणे राज ठाकरे यांनी व्यक्त करत आपल्यामधील कलाकार व राजकारणी यामधील विविध रूपांचे दर्शन घडविले.

डेव्हिड लो हे इंग्लंडमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार  हे माझे सुरुवातीपासून आदर्श होते. त्यानंतर आर. के. लक्ष्मण यांचा मी चाहता झालो. परंतु, मधल्या काळात वृत्तपत्रात व्यंगचित्राची जागा पहिल्या पानाऐवजी आतमध्ये येऊ लागल्याची खंत त्यांनी व्यक्त करत मुद्रित माध्यमात छापून येणाऱ्या चित्राशिवाय समाधान लाभत नसल्याचे म्हटले. सध्याच्या सोशल मीडियावर देखील त्यांनी आपल्या शब्दांचे फटकारे ओढले. सोशल मिडियामध्ये कोणीही येऊन काहीही व्यक्त होण्याच्या या पद्धतीवर खरं  पाहता व्यक्त होण्यासाठी पैसे आकारायला हवे. तीच परिस्थिती चोवीस तास चालणाऱ्या न्यूज चॅनेलची आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील असंख्य सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक बाबींचे दर्शन घडत नाही तोपर्यंत काहीही ठीक नाही. राजकारण्यांची व्यर्थ बडबड या चॅनेलवाल्यांनी दाखवून सामाजिक प्रतिमा बिघडवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सद्यस्थितीमध्ये वातावरणातला शांतपणा निघून गेला असून आयुष्याच्या वेगाने जीवनाची माती केली आहे. १९९५ नंतर, मोबाईल चॅनेल, इंटरनेटचे युग आल्यानंतर तर शहरांची वाताहत झाली आहे.  विकास जो होतोच तो लोकसंख्येमुळे शहरात वाढणाऱ्या बेसूमार गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी होतोच ही खरी खंत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील एकदोन उद्योग गेले म्हणून बोंब मारण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने आता चांगल्या योजनांमध्ये लक्ष घालावे. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांचे सर्वच राज्यांकडे समान लक्ष हवे, जी काही योजना व प्रकल्प करायचे असेल ते आपल्याच राज्यात हवे ही भूमिका पंतप्रधानांना शोभत नाही. पंतप्रधानांनी काही चांगल्या गोष्टी ज्यामध्ये ३७० कलम, रामजन्मभूमी, आदी प्रश्न मार्गी लावले त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, अशी टिप्पणी ठाकरे यांनी यावेळी केली.

  राज्यकर्त्यांची व्याख्या स्पष्ट करताना त्यांनी, येथे काम करणाऱ्यांचा स्वभाव हा मोकळा-ढाकळा असायला हवा. तो व्यापारी नसावा तर मोठ्या मनाचा असावा. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणूनच पवार व ठाकरे या दोन नावांनी राज्यावर अद्यापही आपला प्रभाव टिकवून ठेवला असल्याचे ते म्हणाले. सुमारे दिड तास रंगलेला हा परिसंवाद तरुणाईला आनंद व ऊर्जा देणारा ठरला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे विश्वस्थ व खजिनदार यशराज पाटील यांनी राज ठाकरे यांचा स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *