यावर्षी ४ मार्च हा पन्नासावा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जात आहे. ४ मार्च १९७२ पासून राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून याची सुरुवात झाली. औद्योगिक सुरक्षा तसेच घातक व ज्वालाग्राही पदार्थ हाताळताना तसेच उत्पादन व साठवणूक प्रक्रियेत होणाऱ्या अपघातात होणारी जीवित आणि वित्तहानी हा चिंतेचा विषय आहे. आग, विद्युत उपकरणे आणि वितरण, रस्त्यावरील वाहतूक आणि अपघात, जैव आणि सूक्ष्मजीव विषाणूंचा प्रादुर्भाव आणि प्रसार यामुळे निर्माण होणारे साथीचे आजार अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. कोरोना सारख्या महामारीने निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न अनेक आहेत. आण्विक पदार्थ आणि उच्चदाब विद्युत यामुळे होणारे अपघात – जीवितहानी, स्वास्थ्य समस्या अशा एक ना अनेक समस्या सध्या जगासमोर आहेत. त्यामुळे एकूणच होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि वातावरणीय बदल यामुळे अतोनात नुकसान होऊन एका अर्थाने युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. आर्थिक समस्यांमुळे देशात विकासकामात अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व परिस्थितीत मानवी जीवन भरडले जात आहे.
यावर उपाय म्हणजे समाजात सुरक्षाविषयक जागृती निर्माण करून, नियमांचे पालन करून,अपघात शून्य स्थितीचे उद्दिष्ट ठेवायला हवे. तसेच प्राकृतिक अथवा मानवनिर्मित आपदेमध्ये घ्यावयाची काळजी, प्रशिक्षण आणि जागृत समाजाचे योगदान निश्चित आवश्यक आहे याची जाणीव या दिवशी करून दिली जाते. आपल्या आत्मनिर्भर भारतासाठी सुरक्षा महत्वाची आहे.
भारत सरकारने विविध योजनेद्वारे नविन शक्तिशाली, स्वयंपूर्ण आणि विकसित देश बनविण्यासाठी खूप प्रयत्न सुरु केले आहेत. आत्मनिर्भर भारत ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे.सर्वच क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. यामुळे जगभर भारताचा गौरव होऊन देशाला एक आदराचे स्थान प्राप्त होणार आहे. त्यासाठी सर्व १३० कोटी देशवासीयांचे योगदान आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे.
आपल्या देशाची सुरक्षा सशस्त्र सेना बाह्य शत्रूंपासून तर पोलीस अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. तरीही होणाऱ्या विविध अपघातात आणि नैसर्गिक आपदेमुळे जीवितहानी होते. मालमत्ता सोई- सुविधांचे नुकसान होत असते त्यामुळे आर्थिक पातळीवर देश मागे पडतो आणि विकास कामांना खीळ बसते.
जर सर्वच कामगार आणि नागरिक यांनी काम करताना जीवानाच्या सर्व स्तरावर काळजी घेतली, नियम पाळले,अपघात टाळता आले तर अपघात शून्य सेवाकार्य करता येईल. त्यातून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी टळेल. त्यावर होणारा खर्च वाचून तो पैसा प्रगतीसाठी पूरक ठरेल.
प्रत्येक नागरिकाने आपली स्वतःसाठी,कुटुंबासाठी, समाजासाठी,पर्यायाने देशासाठी असणारी जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून दरवर्षी ४ मार्च ला प्रतिज्ञा करण्याची गरज आहे. आपले प्रत्येक काम जबाबदारी घेऊन, सर्व सुरक्षा नियम पाळून तसेच धोकादायक कामात पुरेसे प्रशिक्षण घेऊन काम करायला हवे.
सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपले काम करायला हवे.उदा. महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना, मुलांनी पतंग खेळताना,आनंदोत्सव साजरे करताना, वाहन चालवताना, आतषबाजी, पर्यटन, रंगपंचमी खेळताना आपला वावर सुरक्षा नियम पाळून करावा.
सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन जर प्रत्येक भारतीय नियमांचे पालन करू शकला तर नक्कीच अपघात कमी होतील. सुरक्षेचे महत्त्व जनमानसात बिंबविण्यासाठी ४ मार्च ते १० मार्च सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला
◆◆ चला आपला देश सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवूया.◆◆
◆ काशिनाथ देवधर ◆
(लेखक डी.आर.डी.ओ. चे वरिष्ठ शास्त्रज्ञ असून गन एक्स्पर्ट आहेत. त्यांचा गेली चाळीस वर्षे सैनिकी शस्त्रास्त्रे संशोधनाचा अनुभव आहे.)