सावरकर समजून घेताना भाग 2 (पूर्वार्ध): वि. दा. सावरकर – माफीवीर की राष्ट्रवीर

लेख
Spread the love

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे काही अनेक, गलिच्छ, बिनबुडाचे, हास्यास्पद आरोप होतात त्यातील एक आरोप म्हणजे, अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत.

हा बिनबुडाचा आरोप कसा योग्य आहे हे दाखवण्याकरता, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे केलेल्या आवेदन पत्रांचा आधार घेतला जातो आणि सावरकर हे कोणी सिंह नसून ते एक गरीब शेळी होते असे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न केला जातो. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली, ऐतखाऊ मंडळी या कल्पनांच्या घोड्यावर स्वार होऊन स्वतःच्या अकलेचे तारे तोडत असतात. अर्थात हे करण्यामागे त्यांचा उद्देश हा सत्यकथन नसून, केवळ भ्रम निर्माण करणे आहे हे वारंवार सिद्ध होत आले आहे.

सावरकरांनी जेंव्हा ही आवेदन पत्रे सरकारपुढे मांडली तेंव्हा सावरकर, अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये एक कैदी म्हणून कारावास भोगत होते हे विसरता येणार नाही. जेंव्हा एखादा कैदी आपल्या सुटकेसाठी पत्रव्यवहार करतो, तेंव्हा मी कसा चांगला आहे याप्रमाणेच भविष्यात मी किती निरुपद्रवी असेन याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय त्याची सुटका कशी होईल ?

राजकारणामध्ये वेळप्रसंगी माफी मागणे या विषयाचे नीट आकलन करून घेणे गरजेचे आहे. शत्रूच्या शिबिरात अडकलेल्या राजबंद्याने मागितलेली माफी किंवा केलेली क्षमायाचना आणि सर्वसामान्य मनुष्यमात्राने किंवा कैद्याने मागितलेली माफी यांना एकाच तराजूमध्ये तोलणे शक्य नाही.

प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये तोंडदेखली क्षमायाचना करून, आपली सुटका करून घेणे हा सर्वसाधारण राजकीय डावपेच असतो; याला प्रसंगावधान देखील म्हणता येईल.

जगद्गुरु संत तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे,

उचिताचा काळ। साधावया युक्तिबळ।

आपलें सकळ। ते प्रसंगीं पाहिजे।।

अर्थ :

आपल्या जीवनाचे साध्य, ते साधण्याचा योग्य काळ कोणता? ज्यामुळे आपणाला अपेक्षित ते साध्य होईल, याचा योग्य प्रसंगी बुद्धीचे बळ वापरून सारासार विचार करायला हवा.

म्हणजेच आपले जे साध्य आहे, आपल्या कार्यध्येयासाठी जे उचित आहे ते साधण्यासाठी, योग्य प्रसंगी बुद्धीचे बलाबल वापरून मनुष्याने सारासार विचार आणि त्यातून कृती करणे हेच योग्य असते.

सावरकरांची क्रांतीची शपथ घेतानाची नेमकी भूमिका, भावना आपण मागील भागातून पाहिलीच आहे. त्यांना मातृभूमीला परदास्यातून मुक्त करायचे होते आणि त्यासाठी त्यांना समाजात पर्यायाने स्वदेशात राहणे आवश्यक होते. कारागृहामध्ये सडत पडणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट कधीच नव्हते. मातृभूमीची परदास्यातून मुक्तता हे त्यांचे ध्येय ‘रत्नागिरी पर्वा’ नंतर प्रकटपणे राजकरणात पुन्हा सक्रिय झाल्यावर देखील स्पष्ट होते. आपल्या एका भाषणामध्ये सावरकर म्हणतात,

राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं, यथा साध्यं च साधनं।”

म्हणजे, राष्ट्राचे स्वातंत्र्य हेच आमचे ध्येय असून ते ज्या मार्गाने मिळवणे शक्य आहे त्या मार्गाने आम्ही ते मिळवू. याचाच अर्थ; राष्ट्राचे स्वातंत्र्य मिळवण्याकरता साम, दाम, दंड, भेद यापैकी ज्या साधनाने कार्य करता येईल त्या मार्गाने ते मिळवण्याकरता कार्यरत राहणे, हेच त्यांचे धोरण होते, आणि त्याचाच भाग म्हणून हा पत्रव्यवहार झाला होता.

आता मुख्य पत्रव्यवहाराकडे वळूयात; सावरकरांनी अंदमानातून सरकारला आपली सुटका करावी या करता अनेकदा आवेदन पत्रे पाठवली होती हे सत्य आहे पण त्यामध्ये कोठेही मी चुकलो, मला माफ करा असा उल्लेख नाही. ही सर्व आवेदन पत्रे वकिली पद्धतीने लिहिलेली होती (सावरकरांनी वकिलीचा व्यवसाय जरी केला नसला तरी ते बॅरिस्टर होते, हे विसरता येणार नाही) आणि याबद्दलची माहिती त्यांनी आपले आत्मचरित्र “माझी जन्मठेप” या ग्रंथामध्ये स्वतःहून उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या तथाकथित माफीनाम्याचा कोणीतरी स्वयंघोषित बुद्धीवाद्याने शोध लावला आणि मग ते राष्ट्रापुढे आले असे काहीही नाही.

इथे एक प्रश्न पडतो; स्वतःला ज्या समाजामध्ये राष्ट्रवीर म्हणून सन्मान मिळतो आहे, त्या समाजपुढे मी इंग्रजांचा दलाल आहे असे सिद्ध करणारे लेखन स्वतः सावरकर करतील का? म्हणजेच त्या आवेदनपत्रांमध्ये माफीवीर म्हणण्यासारखे काहीही नव्हते हे सिद्ध होते. मुख्य म्हणजे सावरकरांनी “माझी जन्मठेप” हे आत्मचरित्र रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना म्हणजेच एकप्रकारे कैदेत असताना लिहिले आहे. त्यामध्ये ते मायबाप सरकारबद्दल चांगले, कौतुकास्पद लिहून हवा तास लाभ घेऊ शकले असते. पण सावरकरांना तसा लाभ घ्यायचाच नव्हता म्हणून, जे सत्य होते तेवढेच त्यांनी मांडले आहे.

या पत्रांमधून सावरकर नेमके काय सांगतात, त्याचप्रमाणे त्या आवेदनांमागे त्यांची नेमकी भूमिका काय होती? हे संदर्भासह, उत्तरार्धात पाहुयात.  

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

प्रवर्तन प्रतिष्ठान, पुणे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *