पं.दीनदयाळ उपाध्याय – एक अनाम नायक

महाराष्ट्र लेख
Spread the love

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, समर्थ आणि संपन्न भारताचे एक सुस्पष्ट चित्र डोळ्यासमोर ठेवून ते साकार करण्यासाठीअनेक नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुसंगत विचारसरणी आणि त्यांची अंमलबजावणी कुठलाही गाजावाजा न करता पण सातत्याने आणि विश्वासाने करत राहून त्या चित्राचे विविध आयाम समाजमनात, विचारात रुजविण्याचा प्रयत्न केला अशी अनेक नररत्न आपल्यापैकी अनेकांना माहितीही नाहीत. अशा अनेक ‘अनाम’  वीरांपैकी एक होते पं. दीनदयाळ उपाध्याय.

ज्यापक्षाच्या सुस्पष्ट, तडाखेबंद आणि केवळ देशहितच  डोळ्यासमोर ठेवून आखलेल्या आणि राबविलेल्या ध्येयधोरणांमुळे,सध्याच्या कठीणकाळात सुद्धा आज आपला देश आपल्या ध्येयाकडे जोमाने वाटचाल करीत आहे त्या  भारतीय जनता पक्षाचा जो मूळ जनकपक्ष, म्हणजे भारतीय जनसंघ, त्या जनसंघाचे एक संस्थापक सदस्य म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय.

उत्तरप्रदेशातील एक छोट्याशा खेड्यात जन्मलेला दीनदयाळ लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्रबुद्धीचा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेले, परंतु अशाही परिस्थितीत आपल्या आजोळी राहून त्यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कायम अव्वल राहून पूर्ण केले.  शिक्षण पूर्ण होताच प्राध्यापकपदाची ऑफरही आली. परंतु दीनदयाळांच्या मनात काही दुसरेच विचार गर्दी करत होते. १९४० चा काळ होता, दुसरे महायुद्ध सुरु झाले होते, भारतीय स्वातंत्र्य कुठेही नजरेत येत नव्हते. परंतु दीनदयाळांच्या कानात मात्र भारतमातेची आर्त साद घुमत होती. आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे अशी उत्कट इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कुठल्याही प्रकारच्या नोकरीत आपले मन रमणार नाही हे त्यांनी ओळखले. महाविद्यालयीन काळातच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी परिचय झाला होता. संघसंस्थापक पूज्य डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव त्यांच्या मनावर होता.संघटना, संस्कृती, नेतृत्वआणि ज्या ध्येयासाठी, स्वप्नासाठी जीव ओवाळून टाकावा असं भारतमातेच्या उज्वल भविष्याचं स्वप्नही चतुःसूत्री डॉ.हेडगेवारांच्या विचारांचा पाया होती आणि त्या चतुःसूत्रीने प्रभावित होऊन  पं. दीनदयाळांनी निश्चय केला, ”बास, ठरलं, आपलं सगळं आयुष्य देशहितासाठी, देशकार्यासाठी वाहून घ्यायचं!”

 भरपूर पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवून, घरच्यांची संमती घेऊन  त्यांनी जन्मभर अविवाहित राहून पूर्णवेळ संघप्रचारक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःसाठी निवडलेलं क्षेत्र  होतं समाजकारण. समाजातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी समरस होऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याचं, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या समस्यांचे निराकरण करण्याचं. समस्या जटील आणि सर्वव्यापी व खोलवर रुजलेली होती.त्याकाळचा भारतीय समाज म्हणजे अठराविश्व दारिद्र्य, शोषण, असमानता, भेदाभेद, शिक्षणाचा लवलेशही नाही अशा परिस्थितीत होता. अशा समाजाच्या उत्थानासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि संघप्रचारक म्हणून उत्तरप्रदेशात काम करण्यास सुरुवात केली.

  नियतीच्या मनात मात्र काही वेगळच होते. भारतीय समाजमनाला पचेल, रुचेल आणि भारतीय संस्कृतीच्या भरभक्कम पायावर आधारित  आणि संघसंचालक गुरुजींच्या सूचनेनुसार दीनदयाळांनी संघप्रचारकाचे कार्य थांबवून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना मदत करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. अशा तऱ्हेने डॉ.मुखर्जी आणि पं.दीनदयाळ उपाध्याय यांनी काही इतर धुरिणांच्या सहाय्याने २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. डॉ.मुखर्जी पक्षाचे अध्यक्ष होते आणि पं.दीनदयाळ जनरल सेक्रेटरी .

पुढे १९५३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा मृत्यू झाला आणि या नव्याने स्थापन झालेल्या पक्षासाठी एकसंघटना, विचारसरणी, कार्यक्रम आणि कार्यकर्ते निर्माण करण्याची जबाबदारी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर आली आणि ती त्यांनी किती समर्थपणे पेलली हे, आज छोट्या लवलवत्या पणतीचं एका तेजोमय लोहगोलात झालेलं रूपांतर भारतीय जनता पक्षाच्या रूपाने आपल्या सगळ्यांसमोर आहे.

१९५३ ते १९६८ या त्यांना लाभलेल्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी राजकीय पक्षाची राजनीती, अर्थनीती व समाजनिती कशी असावी यासाठी मार्गदर्शक सूत्रे तयार केली. त्यांच्या लिखाणातून आणि केलेल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी वेळोवेळी लोकांपुढे मांडली.

कच्छकरार विरोधी आंदोलन

राजकीय नेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीतील एकमहत्वाची घटना म्हणजे त्यांनी सुरु केलेले आणि यशस्वीरीत्या पूर्ण केलेले  कच्छकरार विरोधी आंदोलन.

लढाई जिंकून तह हारण्याची भारतीयांची परंपरा तशी जुनीच म्हणायची. इतिहासात त्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. तशीच एक घटना म्हणजे १९६५ च्या पाकिस्तानने सुरु केलेल्या युद्धात, पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये झालेला करार.  भारताच्या पश्चिमसीमेजवळ कच्छमध्ये सुमारे ३५००चौरसमैल इतक्या मोठ्याप्रदेशावर मिलिटरी पॅट्रोलिंग, गस्त घालण्याची पाकिस्तानला दिलेली परवानगी हा प्रदेश युद्धाआधी आणि युद्धानंतरही भारताच्या ताब्यात होता. परंतु सुरुवातीला आपले सैन्य तिथे तैनात नव्हते. .या संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानने त्या भागात काश्मीरधर्तीवर घुसखोरी करून मिलिटरी पोस्ट उभारले आणि मिलिटरी पॅट्रोलिंग सुरु केले. भारतीय सैन्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी तिथे आपले सैन्य तैनात केले. तोपर्यंत काश्मीरफ्रंटवर पाकिस्तानने युद्ध छेडले आणि भारत-पाकयुद्धाला तोंड फुटले. जेव्हा पाकिस्तानची डाळ शिजेना तेव्हा त्यांनी  युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला. युद्ध एकंदर ३ फ्रंटवर सुरु होते.त्यापैकी दोन फ्रंटवर भारताने निर्विवाद विजय प्राप्त केला.परंतु छांब सेक्टरमध्ये आपल्याला अजून निर्विवाद वर्चस्व मिळवायचे होते. तोपर्यंत शस्त्रसंधी झाली आणि त्या शस्त्रसंधीच्या ठरावाच्यावेळी पाकिस्तानने कच्छमधील ३५००चौ.मैलावर आपला अधिकार सांगत तेथे भारतीय सैन्याला पॅट्रोलींग करण्यास मनाई केली. भारतसरकारने हा करार मान्य केला!  हाच तो कच्छकरार !

या कराराविरोधात दीनदयाळ उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाने रान उठवलं, जोरदार आंदोलन छेडलं.ते भारतभर पसरलं.  विचार करा ज्याकाळात सोशलमीडिया, इंटरनेट वगैरे काही नव्हतं. त्याकाळात त्यांनी सबंध भारतभर या कराराविरुद्ध जनमन तयार केले आणि जनआंदोलन छेडलं. सर्व विरोधीपक्षांना  एकत्र करण्याची किमया साध्य केली. सर्वभारतातून दीनदयाळांच्या नेतृत्वाखाली पार्लमेंटसमोर आंदोलक जमा झाले आणि त्यांनी नारा दिला ”कच्छ करार रद्द करा.” दीनदयाळांच्या नेतृत्वाने ते घडवून आणलं. सरकारला फेरविचार करावाच लागला. शेवटी इंग्लंडच्या मध्यस्थीने भारत- पाक करार होऊन  फक्त दहा  टक्के  प्रदेशावर  पाकिस्तानला समाधान मानावं लागलं.

एकाअर्थी कच्छचा भाग भारताकडे अबाधित राहिला ही दीनदयाळांची आधुनिक भारताला भेट आहे

अशा या समाजधुरीण, राजकीय नेत्याला १७५व्या  जयंतीनिमित्त  त्रिवार वंदन.

सुनीती नागपूरकर

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *