सावरकर समजून घेताना : भाग ५ वि. दा. सावरकर : हिंदुत्ववादी की राष्ट्रवादी

लेख
Spread the love

विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच जनसामान्यांच्या मुखी प्रामुख्याने एक शब्द उमटतो तो म्हणजे हिंदुत्ववादी.

जे सावरकर आपल्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करताना दिसतात पण तेच सावरकर अंदमान नंतर मात्र कडवे हिंदुत्ववादी बनतात ही बाब काहींना पचनी पडत नाही. वास्तवात १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ जेंव्हा सावरकरांनी लिहिला तेंव्हा त्यांचा इस्लाम विषयक अभ्यास शुन्य होता. त्यामुळे फतवा, निशाण, जिहाद, काफ़र आदी शब्दांचा नीटसा अर्थच त्यांना समजला नव्हता. तो लढा केवळ इंग्रजांविरुद्ध होता म्हणून ते स्वातंत्र्य समर होते असा गैरसमज होऊन २५ वर्षीय अननुभवी, तरुणाने रचलेला तो ग्रंथ आहे. त्यांच्या या ग्रंथात जिहाद हा शब्द कित्येकदा आलेला आहे.त्यामुळे १८५७ चे युद्ध हे स्वातंत्र्यसमर नसून, तो भारताला दार-उल-इस्लाम करण्याचा जिहाद होता हे समजून घेतले पाहिजे.

१८५७ च्या युद्धा संबंधातले हे मत आमचे स्वतःचे नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत आहे, त्यांनी आपल्या पाकिस्तान या ग्रंथामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. [ या बद्दल अधिक माहिती करता प्रा. शेषराव मोरे यांचा १८५७ चा जिहाद हा ग्रंथ वाचावा ].

सावरकरांची हिदुत्वाकडे वाटचाल करतानाची त्यांची भूमिका नीट समजून घेतली नाही तर; अंदमानपर्व पूर्वीचे सावरकर आणि अंदमानपर्वा नंतरचे सावरकर हे वेगळे भासू शकतात.

सावरकर जेंव्हा अंदमान मध्ये होते तेंव्हा, तेथे त्यांनी इस्लाम, कुराण, त्या आधारे कट्टर मुस्लिम मनाची होणारी जडण घडण, स्वतःचे प्रत्यक्ष अनुभव, खिलापत चळवळ, मुस्लिम लीगचे द्विराष्ट्रवादी धोरण आणि काँग्रेसचे चालू असणारे मुस्लिम धार्जिणे धोरण. या साऱ्या गोष्टी पाहता इंग्रंजांनंतर या राष्ट्रावर लोकशाहीचे राज्य येऊ शकेल का ? आणि जर लोकशाही पद्धतीचे राज्य हवे असेल तर तसे आणण्यात नेमका प्रश्न कोणता ? या साऱ्या गोष्टींचा विचार त्यांनी अंदमानातच केला होता.

मुस्लिम गटाचे त्यावेळेसचे म्हणणे होते की; राज्य करणे आणि तेही शरियत नुसार राज्य करणे हा मुसलमानांचा जन्मसिद्ध आणि धर्माने दिलेला हक्क आहे, त्याच प्रमाणे इंग्रजांनी मुसलमानांकडून राज्य घेतले असल्याने ते मुसलमानांना परत करावे. हिंदूंना राज्य हवे असल्यास ते तलवारीच्या जोरावर मिळवावे लागेल.

सावरकर अंदमानावरून परत येईपर्यंत बहुसंख्य हिंदू समाज हा गांधी आणि काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम चळवळींना राष्ट्रीय चळवळ मानून, मुस्लिम नेत्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीला भुलून, हिंदू – मुस्लिम ऐक्याची गाणी गात होता, खिलापत चळवळीमध्ये हिंदूंचा पाठिंबा मिळावा म्हणून गांधीजींचे नेतृत्व मुस्लिम नेत्यांनी मान्य केले होते परंतु, गांधीजींचे अहिंसेचे धोरण हे त्यांना मान्य नव्हते.

एकंदरीतच त्यावेळेसची परिस्थिती पाहता, मुख्य प्रश्न हा स्वातंत्र्यप्राप्ती नसून हिंदू-मुस्लिम प्रश्न आहे, हे समजून सांगणे आवश्यक होते.वास्तविक गांधीजी आणि काँग्रेसला देखील हा प्रश्न निश्चितच माहीत होता; आणि म्हणूनच संपूर्ण स्वातंत्र्यापेक्षा स्वराज्याची मागणी काँग्रेस करत होती.एकीकडे इंग्रजांसोबत राज्यकारभार चालू ठेवायचा आणि दुसरीकडे मुस्लिमांचे मन वळविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होती.

मुस्लिमांचे मनपरिवर्तन करण्याकरता, सिमला करार, वंदेमातरमला तिलांजली, खिलाफत चळवळीला पाठिंबा आदी प्रकार काँग्रेस करत होती पण, मुस्लिम गट मात्र गांधीजींना आणि काँग्रेसला आपले नेतृत्व मानायला तयार नव्हते.

एकीकडे आक्रमक होत असलेला मुस्लिम समाज तर दुसरीकडे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचेच तुष्टीकरण करणारी काँग्रेस यामध्ये अखेर बळी जाणार कोणाचा होता ? केवळ आणि केवळ हिंदूंचाच …. आणि म्हणून ब्रिटीशांनंतर हा देश लोकशाही पद्धतीने चालवायचा असेल तर हिंदूंचे बलाबल वाढवून त्याचे राजकीय शक्तीमध्ये रूपांतरण करणे हा एकमेव पर्याय राहत होता.आणि यासाठीच हिंदू संघटन करणे आवश्यक होते.

हिंदूंमधील स्वतःची हिंदू म्हणून असलेली अस्मिता जागृत करत असताना त्यांच्यातील राष्ट्रीयत्वाची अस्मिता देखील तेवढीच जाज्वल्य राखणे, भविष्यातील आव्हाने पेलण्याकरता त्यांना अद्यतन (UP To Date ), प्रगत विचारांची कास धरावयास लावणे, धार्मिक रूढींचा निकष न ठेवता धर्मियांना एकाच राष्ट्रीय सूत्राने बांधून ठेवणारे तत्व हिंदूंपुढे मांडणे आवश्यक होते. आणि हे सर्व साधण्याचा मार्ग म्हणजे हिंदूंतील हिंदूपण जागे करणे अर्थातच ” हिंदुत्व ” जागृत करणे हा होय.

त्यामुळे सावरकरांची क्रांतिकार्याकडून हिंदुत्वाकडे झालेली वाटचाल ही काही द्वेषातून किंवा स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठीची नसून राष्ट्राला लोकशाही आणि आधुनिकतेच्या मार्गावर नेण्याचीच होती असेच म्हणावे लागेल.

हिंदुत्वाचा पाया रचताना सर्वात महत्वाची आवश्यकता म्हणजे; हिंदूंची व्याख्या ठरवणे हा होता. प्रदीर्घ विचारानंतर सावरकरांनी हिंदूंची व्याख्या नेमकी काय मांडली हे आता पाहुयात.

सावरकरांचा हिंदू :

सावरकरांनी जेंव्हा हिंदूसंघटन करण्याचे निश्चित केले तेंव्हा;  राष्ट्रीयत्वाला धक्का न लावणारी, भौगोलिक, सांस्कृतिकरित्या एकसूत्रता आणणारी, विविध संप्रदायातील प्रचलित उपासना पद्धतींना, धारणांना धक्का न लावणारी, हिंदूंची नेमकी व्याख्या मांडणे आवश्यक होते. त्यापूर्वी हिंदूंच्या अनेक व्याख्या प्रचलित होत्या पण त्या व्याख्येतून कोणी ना कोणी बाजूला राहतच होते. उदा: वेदप्रामाण्य मानणाऱ्यांना हिंदू म्हणावे अशी टिळकांनी केलेली व्याख्या अवैदिक संप्रदायांना हिंदूंच्या कक्षेतून बाहेर ढकलते. त्यामुळे ही व्याख्या सर्वसमावेशक ठरू शकत नाही. दीर्घ आणि दूरगामी विचार मनात ठेवून सावरकरांनी मांडलेली हिंदूंची व्याख्या खालील प्रमाणे.

आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिकाः।

पितृभूपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः ॥

अर्थ : सिंधू नदीच्या उगमापासून ते सिंधुसागरा पर्यंत असणारी ही भारतभूमी ज्यांची पितृभू आणि पुण्यभू आहे तो तो हिंदू आहे. भारत देशामध्ये जो पिढ्यानपिढ्या राहत आहे आणि ज्याचा उपासना संप्रदाय हा भारतातच उगम पावला आहे तो तो मनुष्य हिंदू आहे.

सावरकरांच्या या व्याख्येनुसार, जैन, शिख, बौद्ध, संप्रदायातील सर्व भारतीय नागरिक हिंदू ठरतात. तर मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन, ज्यू, यहुदी आदी भारताबाहेर राहणारे किंवा ज्यांचा उपास्य संप्रदाय भारताबाहेर जन्मला आहे असे सर्व अहिंदू ठरतात.

सावरकरांनी केलेली व्याख्या आणि संविधानातील व्याख्या या सारख्याच आहेत. संविधानातील कलम २५ ब मधील निर्देशानुसार हिंदू या संज्ञेखाली घेतलेले समाजघटक हे सारखेच आहेत.

सावरकरांनी केलेली हिंदूंची व्याख्या ही १९२४ सालातील आहे तर आपले संविधान १९४९ साली लिहिले गेले आहे. सावरकरांचा दृष्टिकोन किती दूरदर्शी होता हे यातून स्पष्ट होते.

सावरकरांची हिंदुत्वाकडे वाटचाल करतानाची सामाजिक, राजकीय स्थिती नेमकी काय होती हे या भागातून स्पष्ट केले आहे, तसेच त्यांनी केलेली हिंदूंची व्याख्या देखील पाहिली.

सावरकरांची हिंदुत्ववाद मांडतानाची त्यांची भूमिका पाहता ते हिंदुत्ववादी तर होतेच पण राष्ट्रवादीही होते हे स्पष्ट होते.

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

प्रवर्तन प्रतिष्ठान पुणे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *