सायबर विश्व व कायदा


काही दिवसांपूर्वी मुंबई मधील वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ल्याचा शक्यता वर्तविण्यात येत असताना , संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ  संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणत: सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर क्राईमशी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ आहेत. पण, जरा सूक्ष्मविचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच या सायबर क्राईमचा सामना करावा लागतो.

आपल्या ई-मेलवर स्पॅममेल येत असतात, मोबाईलवर अनावश्यक कॉल, मेसेजेस येतात, नेट बँकिंग अकाऊंट असेल तर त्याचा पासवर्ड, आय. डी. हॅक होतो. हे सर्व प्रकार सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतात. संगणक, इंटरनेट यांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती, संस्था आदींच्या संगणक प्रणालीमध्ये शिरून त्यातील माहिती हॅक करणे (चोरणे), त्याचा गैरवापर करणे, व्हायरस पाठविणे, मेलद्वारे फसवणूक, धमकी देणे, खंडणी मागणे अशा कारवायांना सायबर क्राईम म्हणता येईल. परंतु, सायबर क्राईमची व्याप्ती व तंत्र हे रोज बदलते असल्याने त्याला विशिष्ट अशा रचनेत वा संकल्पनेत बसविणे थोडे जिकिरीचे आहे.

 नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे पहावे लागेल. आधुनिक काळात ही एक जागतिक समस्याच बनली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा गुन्ह्यांत महिला मोठ्या संख्येने बळी ठरलेल्या दिसतात. त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेलाच यामुळे धोका आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटी ॲक्ट 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000) हा कायदा आपल्याकडे करण्यात आला आहे. हॅकिंग, इंटरनेटवर अश्लिल गोष्टी किंवा मजकूराचे प्रकाशन इत्यादी गोष्टी कायद्याने गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मात्र एकूणच महिलांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता हा कायदा परिपूर्ण नाही, असेच म्हणावे लागेल.

‌ लॉकडाउनमुळे काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर बहुतांश लोक घरून काम करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी लोकांची खटपट सुरू आहे. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यांमध्ये कित्येक पटीनं वाढ झाली आहे. काही सायबर हल्लेखोर नोकरीकरीता बनावट वेबसाइट बनवून तसंच सरकारच्या विविध योजनांच्या बनावट वेबसाइट तयार करत आहेत. त्याचबरोबर करोना युद्धाच्या नावाखाली निधी जमा करण्याचं कारण दाखवत लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. क्रेडीट कार्ड KYC अशी कारणं दाखवत होणाऱ्या फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. सायबर गुन्हेतज्ज्ञांच्या मते सायबर हल्लेखोर ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष करत आहेत.

अधिक वाचा  पूजा वनदुर्गांची : अन्नमाता ममताबाई भांगरे

 अलीकडच्या काळात इंटरनेटवरच्या गुन्ह्यांच्या म्हणजेच सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर धक्कादायक बातम्या वाचायला मिळत असल्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकांचे लक्षसुद्धा या प्रकारांकडे वळले आहे. पण यातली मुख्य अडचण म्हणजे नेहमीचे गुन्हे किंवा हल्ले कसे घडतात याविषयी सगळ्यांना कल्पना असते; तशी सायबर विश्वाच्या बाबतीत मात्र ती नसते. म्हणजेच गुन्हेगारांच्या एखाद्या टोळीने बँकेवर हल्ला करणे किंवा एखाद्या दहशतवादी संघटनेने बॉम्बहल्ला घडवून आणणे अशांसारख्या प्रसंगांची माहिती सर्वसामान्य लोकांना असते. पण इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे नक्की घडवता येतात तरी कसे आणि त्यांचे स्वरूप कसे असते हे समजून घेणे मात्र अनेक जणांच्या कुवतीबाहेरचे असते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थातच त्यांना या संदर्भातली अगदी तुटपुंजी माहिती असते आणि शिवाय या सगळ्या प्रकारांमधली गुंतागुंत इतकी क्लिष्ट असते की ती समजून घेणे सहजासहजी शक्य होत नाही. नेमक्या याच गोष्टीचा सायबर गुन्हेगार अनेकदा फायदा उठवतात.

आपण प्रथम सायबर गुन्हेगारीविषयी बोलू. याचा फटका अगदी सर्वसामान्य माणसापासून ते एखाद्या देशाच्या मोठ्या कंपनीला/बँकेला बसू शकतो. उदाहरणार्थ ‘फिशिंग’ नावाचा एक गुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर घडवला जातो की खरे म्हणजे त्याविषयी इंटरनेटचा वापर करणाºया सगळ्यांनाच माहिती असणे खूप गरजेचे आहे. पण तरीही सतत इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप माणसे या प्रकाराला सतत बळी पडतात. या प्रकारात इंटरनेटवरचे भामटे सर्वसामान्य लोकांना भुलवून, घाबरवून किंवा फसवून त्यांचे नुकसान करतात. त्यासाठी ते आधी आपल्याला एक घाबरवणारा किंवा भुलवणारा ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे …त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला…’ असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक ‘लिंक’ दिलेली असते. त्या लिंकवर आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाइट उघडली जाते असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या भामट्याने तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते! तिथे ‘तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा’ वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपल्याला भामट्याचे हे काम माहीत नसल्यामुळे आपण गुपचूप ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाइप करतो. मग ‘पासवर्ड बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, धन्यवाद’ वगैरे गोष्टी आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात आणि आपल्याला हायसे वाटते. पण इथेच सगळा घोटाळा झालेला असतो. भामट्याने हा ई-मेल आपल्याला स्वत:च आपल्या बँकेच्या नावाने पाठवलेला असतो. त्यातही त्याने माहिती अशा प्रकारे लिहिलेली असते की आपला त्यावर चटकन विश्वास बसावा. तसेच हा ई-मेल त्याने अगदी आपल्या बँकेचा वाटेल अशा ई-मेल आयडीवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो खरेच आपल्या बँकेकडून आलेला आहे, असे आपल्याला वाटते. तसेच त्या ई-मेलमध्ये त्या भामट्याने दिलेली ‘लिंक’ आपल्याला आपल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाते असे आपल्याला वाटत असले तरीही ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला त्या भामट्याच्या बोगस वेबसाइटकडे नेत असते. मग तिथे आपण आपल्या बँकेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाइप केला की तो त्या भामट्याच्या हाती लागतो! मग तो भामटा ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या खºया वेबसाइटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यातले सगळे पैसे स्वत:च्या खात्यात वळवतो.

अधिक वाचा  छत्रपती संभाजीमहाराज [१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९ (फाल्गुन अमावस्या)]

दुसरा प्रकार सायबर दहशतवादाचा असतो. यात एखाद्या माणसाचे नुकसान करण्याऐवजी मोठमोठ्या वेबसाइट्स हॅक करणे, अतिरेक्यांनी आपले घातपाताचे संदेश गुफ्तपणे इंटरनेटचा वापर करून एकमेकांना पाठवणे असे प्रकार केले जातात. अगदी अलीकडेच ‘अल कायदा’च्या सदस्यांनी एकमेकांना पॉर्नोग्राफिक फिल्म्समध्ये दडवून घातक संदेश पाठवले असल्याचा प्रकार उघडकीला आला. अर्थातच असे प्रकार उघडकीला आणणे कठीण असते. पण सायबर दहशतवादाचा प्रकार इथवरच थांबत नाही.

सध्याच्या आणि भविष्यातल्या जगात कम्प्युटर्स तसेच इंटरनेट या तंत्रज्ञानावर जगभरातले अनेक व्यवहार अवलंबून असल्यामुळे या तंत्रज्ञानावर केलेले हल्ले खूपच धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ अनेक पाश्चिमात्य देशांमधली पाणी शुद्धीकरण यंत्रणा तसेच पाणीपुरवठा यंत्रणा इंटरनेटवरून नियंत्रित केली जाते. अशा यंत्रणेचा ताबा मिळवून त्यात घातक फेरबदल करण्यात अतिरेक्यांना यश आले तर काय थैमान घातल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. देशोदेशी सर्वसामान्य लोकांची खासगी माहिती, क्रेडिट कार्डांचे क्रमांक वगैरे गोष्टी इंटरनेटवर असतात. त्यांचा गैरवापर करून मोठमोठ्या बँकांना प्रचंड नुकसान पोहोचवण्यातही अतिरेक्यांना अधूनमधून यश येत असते. अनेक देशांच्या किंवा अधिकृत पातळीवरच्या वेबसाइट्सवर अपमानास्पद मजकूर टाकण्याचे प्रकारही घडत असतात.

अधिक वाचा  विकास जम्मू काश्मीरचा : जम्मू-काश्मीरमधील रस्ते उभारणी, समृद्धीची पायाभरणी

 आपल्या देशात अजूनही सायबर गुन्हेगारी किंवा सायबर दहशतवाद यांना नेहमीच्या जगातली गुन्हेगारी तसेच दहशतवाद यांच्याइतके महत्त्व दिले जात नाही ही अत्यंत धोकादायक आणि खेदपूर्ण गोष्ट आहे. कारण आता गुन्हेगारांनी सगळे नवे तंत्रज्ञान आत्मसात केलेले असून नेहमीच्या पद्धतीने गुन्हे करून पकडले जाण्याचा भोळसटपणा आता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. पण अशा प्रकारे गुन्हेगार आणि अतिरेकी नव्या प्रकारे आपला संहार घडवत असतील तर त्यासाठी युद्धपातळीवर आपल्या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. इंटरनेटचे तंत्रज्ञान सुरक्षित करण्यासाठी जे शक्य असेल ते केले पाहिजे. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांनीसुद्धा इंटरनेट वापरतानाचे धोके लक्षात घेऊन आपण या सायबर हल्ल्यांना बळी पडणार नाही यासाठीची काळजी घेतली पाहिजे.

अ‍ॅड.राकेश सोनार,पुणे

9613024302

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love