इंदापूर -ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी वाहतूकदार आणि कारखाना कामगारांच्या हक्काच्या पैशांसाठी आवाज उठवल्यामुळे राज्यभरात १७ पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले युवा नेते रविराज साबळे पाटील आज कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान राखत इंदापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना बाबू बोत्रे यांच्या ‘ओमकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड’च्या कारभारावर कडाडून टीका केली आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा हा लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
रविराज साबळे पाटील यांनी स्पष्ट केले की, बाबू बोत्रे यांनी महाराष्ट्रातील १७ सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतले आहेत, परंतु हे कोणत्या नियमांत घेतले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. २९ तारखेला एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची थकलेली बिले, वाहतूकदारांचे पैसे आणि कामगारांचा पगार यावर भाष्य केल्यानंतर, बाबू बोत्रे यांच्या समर्थकांनी सूडबुद्धीने राज्यभरात १७ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. मुळात ज्याची इज्जत गेली तो फिर्यादी असायला हवा, परंतु इथे दुसऱ्यांनाच फिर्यादी बनवून कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच प्रकारच्या कृत्यासाठी इतक्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची परवानगी संविधान देते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी साबळे पाटील यांनी बाबू बोत्रे यांच्यावर गंभीर आर्थिक आरोप केले. त्यांच्या मते, बोत्रे यांच्यावर २४९५ कोटी रुपयांचे कर्ज असताना कोणत्या आधारावर सहकारी कारखाने भाडेतत्त्वावर दिले गेले, हा संशोधनाचा विषय आहे. शुगर ॲक्टनुसार १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’ (FRP) देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना आजही हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. परळी आणि इतर युनिट्ससमोर शेतकरी आणि वाहतूकदार आजही आंदोलने करत आहेत. जिथे २९५० ते ३१५० रुपये एफआरपी अपेक्षित आहे, तिथे केवळ ८०० रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बोत्रे हे कोणाचे तरी ‘दलाल’ असून सहकार क्षेत्र संपवण्यासाठी त्यांना काही शक्तींनी पुढे केले आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला असून योग्य वेळी या सूत्रधारांची नावे उघड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सहकार मंत्रालय, साखर आयुक्त आणि प्रशासन या गंभीर विषयावर झोपले आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायद्याचा गैरवापर करून आवाज उठवणाऱ्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार सामान्य शेतकऱ्यांचे नसून केवळ पिळवणूक करणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. २००-२०० किलोमीटरवरून आपल्याला हेलपाटे मारायला लावून लढा शांत करण्याचा प्रयत्न होत असला, तरी शेतकऱ्यांच्या घामाचा एक ना एक रुपया वसूल केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, असा इशारा देत त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.













