भारतीय रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण; सोने विक्रीच्या अफवा फेटाळल्या, ८८०.५२ मेट्रिक टन सोन्याचा साठा सुरक्षित
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या सोने विक्रीच्या सर्व अफवांचे पूर्णपणे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही आणि हा साठा ८८०.५२ मेट्रिक टन इतकाच स्थिर आहे. आरबीआयने या संदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे असल्याचे सांगत जनतेला केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांत अर्थजगतात अशा बातम्यांनी खळबळ उडवून दिली होती की, रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीतील तब्बल १२ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १.२० लाख कोटी रुपये किमतीचे सोने विकले आहे. ब्लूमबर्गच्या अर्थतज्ज्ञांनी असा दावा केला होता की, २२ मे पूर्वीच्या दोन आठवड्यांत आरबीआयने हे सोने विकले असावे आणि या पैशांचा वापर परकीय चलन (Forex) खरेदी करण्यासाठी केला गेला आहे. या दाव्यानुसार, पश्चिम आशियातील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर पडणारा दबाव आणि रुपयाची होणारी घसरण रोखण्यासाठी सुमारे ८२.६ मेट्रिक टन सोने विकण्याची नामुष्की बँकेवर ओढवली असल्याचे म्हटले जात होते.
या अफवांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक संकटाचा मोठा परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि डॉलरच्या मजबुतीमुळे भारताच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत परकीय चलन साठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने इंधनाच्या किमती आणि मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ करण्यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. या बाह्य धक्क्यांमुळे रिझर्व्ह बँकेने ‘गुपचूप’ सोने विक्रीचा मार्ग अवलंबला असल्याचा दावा अर्थतज्ज्ञांनी केला होता, मात्र रिझर्व्ह बँकेने हे सर्व दावे आता फेटाळून लावले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ अखेरपर्यंत भारताकडे एकूण ८८०.५२ मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. यातील ७७ टक्के सोने हे देशातच सुरक्षित ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित २३ टक्के सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे जमा आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या मासिक बुलेटिनमध्ये ही माहिती स्पष्टपणे नमूद केली असून, सोन्याचा हा प्रत्यक्ष साठा आजही तितकाच असल्याचे बँकेने सांगितले आहे.













