शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलि ..

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण आणि नुकतीच वयाची शंभरी गाठलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांना पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलि वाहिली..

पंतप्रधान मोदींनी जागवल्या आठवणी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मन व्यथित झालं- अमित शाह

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, “बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी समजल्यावर मी खूप व्यथित झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजोमय जीवन जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा तरुण पिढीच्या हृदयात रुजवल्या.”

असा शिवआराधक शोधूनही सापडणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते – शरद पवार

महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास सांगून जनजागृती करून ज्यांनी शेकडो व्याख्याने घेतली आणि नव्या पिढीला याबाबत आस्था निर्माण केली असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते. वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली. शिवरायांचं चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवलं, अशा शब्दांत शरद पवारांनी शिवशाहीर पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.

बाबांसाहेबांमुळे आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले- नितीन गडकरी

एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे.

वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते.

आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता.

मनाला अतिशय वेदना होत आहेत – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून लिहिले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत.

महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार

महाराष्ट्रातील गड-किल्ले, इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन,व्याख्यान,‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.भावपूर्ण श्रद्धांजली!

आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेलेछत्रपती संभाजीराजे

आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. श्री.बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली! अशा शब्दांमध्ये राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे ट्विट करून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *