पुणे- नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना सोमवारी रात्री पुण्यातील शेवाळवडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांनी एका ब्रीझा कारमधून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांच्या नोटा भरलेल्या बॅगा आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय 47) रा. लासुर्णे. ता. इंदापूर जि. पुणे यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही रोकड मोजण्याचे काम मंगळवारी सकाळी सातपर्यंत सुरू होते. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का?, का या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का? त्या अनुषंगाने पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
शहरात वाहतुक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात येत आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतुक विभागातील कर्मचारी शेवाळवाडी परिसराजवळ असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयीत वाहनांची तपासणी करत असताना त्याला एक व्यक्ती आणि एक महिला संशयास्पदरित्या ब्रीझा कारमधून येताना दिसली. त्याने लागलीच कार थांबवून गाडीची तपासणी केली असता त्याला गाडीच्या मागील डिक्कीत संशायास्पदरित्या बॅगा दिसून आल्या. विमल गुटखा नाव असलेल्या चार बँगा व त्याबरोबर छोट्या मोठ्या बॅगा पंचनामा करण्यासाठी गाडीतून बाहेर काढण्यात आल्या. यावेळी नोटांच्या काही छोट्या बॅगा ब्रीझा कारच्या मधल्या सीटखाली देखील लपवून ठेवण्यात आल्या होत्या त्या बॅगा गांधी याने पोलिसांसमक्ष काढून दिल्या. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी बॅगा रोकड मोजण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आत नेण्यात आल्या. सकाळी ७ वाजेपर्यंत पोलिसांकडून नोटा मोजण्याचे काम सुरू होते.
जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का?, का या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का? त्या अनुषंगाने पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीवरून ८ मे रोजी संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट 5 यांनी संशयित ब्रिजा कार ताब्यात घेऊन सदरचे वाहन आणि संशयित व्यक्तीस हडपसर पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर पंचनामा करून वाहनात मिळून आलेल्या बॅगा तपासून त्यामध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले. या व्यक्तीकडे कसून चौकशी केली असता सदरची रक्कम त्याच्या राहत्या घरातून पुणे येथील महाराष्ट्र बँक मुख्य शाखा, लक्ष्मीरोड येथे कर्जापोटी भरायची होती असे सांगत आहे. याबाबत सी आर पी सी कलम 41(D) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली असून आयकर विभाग पुणे यांना पुढील कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे.