पुणे- हवमान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत असल्याने उद्या (दि.26 जुलै) भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील तसेच खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस होत असून त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहात आहेत. तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आजही शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै २०२४ व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे.
तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक आहे, असे डॉ.दिवसे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे. .
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या आदेशात म्हटले आहे.