राज्यात लॉकडाऊन लागलाच तर? असा असेल लॉकडाऊन

महाराष्ट्र
Spread the love

मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असल्याने पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन लावण्यासाठी विरोधीपक्ष भाजपसह व्यापारी, हातावर पोट असणारे व्यावसायिक आणि सर्वच थरातून विरोध होत आहे. त्यामुळे 2 एप्रिलला सरकारची लॉकडाऊनबाबत काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी असाच कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. पुढे हा लॉकडाऊन वाढत वाढत गेला. त्यानंतर हळूहळू अनलॉक केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात एका दिवसाला सुमारे 30 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे.

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच नियोजन करण्याचे निर्देशदिले होते. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, हा लॉकडाऊन मर्यादित स्वरूपाचा असण्याची शक्यता विरोध लक्षात घेता व्यक्त केली जात आहे.

टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात येत्या 2 एप्रिलपासून मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल. या लॉकडाऊनचं स्वरुप 50 टक्के लॉकडाऊन आणि 50 टक्के निर्बंध असे असतील असे म्हटले आहे.  

टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार 2 एप्रिलला लॉकडाऊन केलाच, तर आधीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणं बंद केली जातील. आता ही गर्दीची ठिकाणं कुठली तर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात जिथं जिथं तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाणं बंद केली जातील.

मागील लॉकडाऊन हा सलग होता. म्हणजे, 24*7 सगळं बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतची असू शकेल. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला जातो. त्यात धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करतंय. शिवाय हा लॉकडाऊन अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो, दीर्घ कालावधीचा लॉकडाऊन नसेल अशी प्राथमिक माहिती आहे

भाजीपाला, किराणा मिळणार का?

मग प्रश्न येतो, भाजीपाला, किराणा आम्हाला मिळणार का? की हा आधीच भरुन ठेवायचा? तर या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असेल. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.

आंतरजिल्हा वाहतूक सुरु राहणार का?

काहींचा प्रश्न असाही असू शकतो, की मागील वेळी जशा आंतरजिल्हा बस बंद झाल्या होत्या तशा याही वेळी होतील का? तर सुरुवातीला तरी असं केलं जाणार नाही. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल असं सरकारी सूत्रांकडून कळतंय. कारण, आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचं मोठं नुकसान होतं. ते यंदा होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

बसस्टँडपासून रेल्वेस्टेशनपर्यंत कोरोना चाचण्या करण्याचं नियोजन

हेच नाहीतर रेल्वेस्टेशन्स, विमानतळं, बसस्थानकं इथं कोरोना चाचण्या करण्याचंही धोरण सरकारने ठरवलं आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांन वेगळं करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केलं जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करतंय.

एकूणच लॉकडाऊनचा अर्थ वर्षभरात बदलला आहे. अर्थकारणाला फटका न देता, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, हा लॉकडाऊन होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि काही लक्षणं दिसली की लगेच कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागलाच, तर त्याचं काटेकोरपणे पालनही गरजेचं असल्याचं टीव्ही 9 मराठीने म्हटलं आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *