पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे mns पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांनी उचलबांगडी करून नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakaray यांनी वसंत मोरे vasant more यांना फोन केला. शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा अशा शब्दांत आमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे raj thakaray यांनी मशिदींच्या भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला. यानंतर मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. माझ्या प्रभागात हनुमान चालीसा लावणार नाही, सध्या रमजान सुरु आहेत, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, माझी हकालपट्टी झालेली नाही. शेवटी पक्षात खांदेपालट होत असतात. माझ्यावरील कारवाई आधी मीच राज ठाकरेंना सांगितले की, मे नंतर मला शहराध्यक्षपदावर राहायचे नाही, असा दावा मोरे यांनी कालच केला होता.
वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहे. वसंत मोरे यांना अनेक पक्षांनी ऑफर दिली आहे. स्वत: वसंत मोरे यांनीही याबाबत पुष्टी केली आहे. वसंत मोरे यांना पक्षात येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप या जवळपास सर्वच पक्षांनी ऑफर दिली आहे. वसंत मोरे यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मुंबईत शिवतीर्थ येथे जाणार की मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार याबाबत उत्सुकता आहे.
स्वत: वसंत मोरे यांनी म्हटले की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. मात्र, त्या वेळी मी कात्रजमध्ये नव्हतो. त्यामुळे त्यांच्याशी माझे थेट बोलणे होऊ शकले नाही. त्यानंतर मला पुणे मनसे शहरप्रमुख संजय मोरे यांचा फोन आला. त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दल सांगितले. त्यांनी मला मुंबईला भेटण्यासाठीही बोलावले आहे असे मोरे म्हणाले.
दरम्यान,मी राज ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली आहे. त्यासाठी मी त्यांना मेसेजही केला आहे. पण अद्याप तरी त्यांचा मला कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नाही. आजवर मी मेसेज केला आहे आणि त्यांचा रिप्लाय आला नाही असे कधीच झाले नाही. त्यामुळे साहेब काहीसे नाराज असल्यासारखे वाटते आहे. पण त्यांची नेमकी नाराजी काय आहे हे मात्र मला समजू शकले नाही.
मनसेच्या उपाध्यक्षांचाही राजीनामा
वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेत आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.