स्वामींच्या दोन बोटांमधील ‘तो’ तेजस्वी सूर्यमणी आता पुण्यात; इतिहासात पहिल्यांदाच राजवाड्याबाहेर होणार दर्शन!

स्वामी समर्थ सूर्यमणी आणि पादुका दर्शन पुणे
स्वामी समर्थ सूर्यमणी आणि पादुका दर्शन पुणे

पुणे(प्रतिनिधी)- : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आजही भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामध्ये सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन सर्वसामान्य भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर भक्तांना घेता येईल, अशी माहिती अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी दिली आहे.

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा येत्या १७ व १८ मार्च, २०२६ रोजी दोन्ही दिवस सायं. ५ ते रात्री १० आणि १९ मार्च, २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत एरंडवणे १०० फूट डी. पी रस्त्यावरील सिद्धी – साज बँक्वेट येथे संपन्न होईल, हे दर्शन सर्व भक्तांसाठी विनामूल्य खुले असेल, असेही त्यांनी सांगितले. १९ तारखेला सायंकाळी एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

अधिक वाचा  pune municipal corporation election 2026 : विकासाच्या बुरख्याआड गुन्हेगारीचे 'राजकीयीकरण' आणि जनतेशी क्रूर प्रतारणा

या विषयी अधिक माहिती देताना श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) म्हणाले की, “भक्तांना परिचित असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या अनेक चित्रांमध्ये व प्रतिमांमध्ये स्वामी महाराज आपल्या दोन बोटांमध्ये एक तेजस्वी मणी धारण करून बसलेले दिसतात. हाच तो पवित्र सूर्यमणी होय. हा सूर्यमणी स्वामींच्या दिव्य शक्तीचे आणि आध्यात्मिक तेजाचे प्रतीक मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आयुष्यभर भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दुःखांचा नाश करण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अनेक चमत्कारिक लीलांचा अविष्कार केला. त्या दिव्य लीलांचे स्मरण करून देणारा हा सूर्यमणी म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत साक्षीदार मानला जातो.”

परंपरेनुसार, हा सूर्यमणी श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः अक्कलकोटच्या राजघराण्यास दिला, तेव्हापासून तो अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये स्वामींच्या उपस्थितीचे आणि कृपाशक्तीचे अद्वितीय स्पंदन आजही अनुभवता येते असे सांगत श्रीमंत मालोजीराजे म्हणाले की, “भक्तांच्या श्रद्धेनुसार, या सूर्यमणीमध्ये सूर्यासारखे तेज, आध्यात्मिक शक्ती आणि स्वामींच्या कृपाशक्तीचे अद्भुत प्रतिबिंब आहे. त्यामुळे त्याचे दर्शन घेताना अनेक भक्तांना मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि अपार भक्तिभाव अनुभवायला मिळतो. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या पवित्र दर्शन सोहळ्याचे आयोजन हे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (२० मार्च) या अत्यंत पावन दिवसाच्या लागलीच आधी करण्यात आले असल्याने या माध्यमातून हजारो भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ घेण्याची संधी मिळेल याचा आम्हाला आनंद आहे.”

अधिक वाचा  ऑन डय़ुटी पोलिसाला कंटेनरने चिरडले : वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार

स्वामी समर्थांच्या कृपेचा हा दिव्य ठेवा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम असून सूर्यमणी व स्वामींनी वापरलेल्या पादुकांचे दर्शन हे भक्तांसाठी केवळ एक दर्शन नसून स्वामी समर्थांच्या दिव्य ऊर्जेशी जोडणारा एक आध्यात्मिक अनुभव असल्याने प्रत्येक स्वामीभक्ताने अत्यंत पवित्र व अविस्मरणीय अशा या आध्यात्मिक सौभाग्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील श्रीमंत मालोजीराजे यांनी केले. दर्शनस्थळी आरती, अभिषेक तसेच होम–हवन यांसारखे धार्मिक विधीही संपन्न होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदर दर्शन सोहळ्यासाठी सुरेखा उत्तमराव बहिरट पाटील यांनी स्थळ प्रायोजकत्व स्वीकारले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love