पुणे – एसटी कर्मचारी आंदोलना बाबत ऊच्च न्यायालयाने सुवर्णमध्य काढत न्याय्य निकाल दिल्यानंतर, एसटी कर्मचारी संघटनांनी गुलाल ऊधळल्याचे वृत्त माध्यमात प्रसिध्द झाले आहे. तसेच मविआ सरकारने देखील या विषयी सकारात्मक भूमिका घेऊन ‘संपावरील गैरहजर कर्मचाऱ्यांवर’ कारवाई न करण्याचे जाहीर करून नागरीकांची व प्रवाश्यांच्या सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर दगडफेक होणे हे आश्चर्यकारक असून आंदोलनाच्या निमित्ताने अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याची संधी हातची गेली या भावनेने काही राजकीय पक्षांचा भ्रम निरास झाल्यामुळेच् हा चिथावणीखोर हल्ला झाला आहे असा आरोप कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.
गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे या घटनेचा जाहीर निषेध करून राज्यस्तरीय ऊच्च पातळीवरील चौकशीची मागणी केली आहे.
एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबिय असोत, शेतकरी आंदोलनातील आत्महत्त्याग्रस्त कुटुंबिय असोत वा मराठा, ओबीसी आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबिय असोत वा कोरोना काळातील पायपीटग्रस्त आत्महत्याग्रस्त मजूर बांधवांची कुटुंबिय असोत.. या सर्वांप्रती काँग्रेस पक्षास निश्चितच संवेदनशीलता व सहानुभूती असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले परंतू, अशाप्रकारे कोणाच्याही घरांवर दगडफेक करून मागण्या मान्य होत नाहीत त्यास घटनात्मक – कायदे प्रक्रीयेचा, मान्यतेचा आधार असावा लागतो.. हे आंदोलनकर्त्यांना समजून देखील नऊमजल्याच्या अविर्भावात द्वेष भावनेने हा भ्याड व निंदनीय हल्ला घडवला गेला.. याची पाळेनुळे शोधून राज्याची बदनामी करणाऱ्यांवर व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील काँग्रेस करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यानी सांगितले..