सावरकर समजून घेताना भाग १- सशस्त्र क्रांतिच का ?


राज्यक्रांती करण्याचे अन्य मार्ग उपलब्ध असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना सशस्त्र क्रांतिकारी व्हावे असे का वाटले असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या भागातून आपण करणार आहोत. तसेच त्यांचे क्रांतिकार्य करतानाचे धोरण, भूमिका आणि भावना यांचाही विचार या भागातून करूया.

साधारणपणे वयाच्या १५ व्या वर्षी, सशस्त्र क्रांतीची शपथ बाल विनायकाने घेतली होती हे आपण जाणतोच. वास्तवात; कोणताही क्रांतिकारक जेंव्हा क्रांतिकार्यास उद्दयुक्त होतो तेंव्हा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. त्यामुळे कोणत्याही क्रांतिकारकाचा उदय ही त्या परिस्थितीवरची प्रतिक्रिया असते असेच मला वाटते.

सावरकरांच्या बाल्यावस्थेचा काळ हा ब्रिटीश सरकारच्या क्रौर्याचा परमोच्च काळ म्हणावा लागेल. १८५७ चा उठाव शमवल्यानंतर, पंजाबमध्ये रणजितसिंहाचे राज्य संपवल्यानंतर १८६५ पासून ब्रिटिशांचे भारतावर निष्कंटक राज्य स्थापन झाले होते. पण हे राज्य काही रामराज्य नव्हते, १८५७ च्या संघर्षाचा परिणाम म्हणून ब्रिटीश आणखीनच जहाल, क्रूरपणाने वागत होते.

जनतेच्या भल्यापेक्षा आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवणे हा प्रमुख  उद्देश मनात बाळगून त्यांचा कारभार चालत असे. त्यामुळे बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी क्रांतिकारकांचे सशस्त्र प्रयत्न चालू होते.  बाल विनायक या क्रांतिकार्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचत होता.

दुसरीकडे हिंदी पुढाऱ्यांना एकत्र करून राज्यकारभार चालवण्याचा डाव देखील इंग्रजांनी चालवला होता, पण या अश्या कारभारात हिंदी पुढाऱ्यांना केवळ मानमरातब मिळत असे, निर्णय घेण्याची फारशी मुभा नसे, म्हणजे हिंदी-इंग्रजी प्रतिनिधींचा कारभार हा शुद्ध दिखाऊपणा होता. अंतिम निर्णय हे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्याच हातात असत. त्यामुळे केवळ नागरी क्रांतिकार्याने इंग्रजी सत्ता बधणार नसल्याने सशस्त्र क्रांतीची जोड असणे आवश्यक आहे, हे जाणवू लागले होते.  

अधिक वाचा  काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

दुसरे असे की, जुलमी कायदे करणाऱ्यांच्या विरोधात काम करायचे तर कायद्याच्या कक्षेत राहून काम करणाऱ्या संस्थांना, निश्चितच बंधने येतात. अश्या संस्था एखादा “सेफ्टी व्हॉल्व्ह” असल्याप्रमाणे सोयीस्कररीत्या सत्ताधीश वापरतात, नव्हे त्या संस्थेची स्थापना मुळातच त्यासाठी असते.

जुलमी सत्ता झुगारून द्यायची असल्यास कायद्यापेक्षा लोकांच्या फायद्याचा विचार करणे हेच आवश्यक बनते आणि मग सत्तेविरुद्ध बंड करून उठणे हाच पर्याय शिल्लक राहतो.

सर्वसाधारणपणे, किशोरवयीन किंवा युवावस्थेतील मनाला, मवाळांपेक्षा जहाल आणि जहालांपेक्षा कृतिशील क्रांतिकारी अधिक जवळचे, आदर्शवत वाटतात. त्यावेळची परिस्थिती आणि बाल विनायकाचे आदर्श यांमुळे बाल विनायकाने जर सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला नसता तरच नवल होते.

त्याच दरम्यान, प्लेगच्या साथीचे निराकरण करण्याच्या निमित्ताने इंग्रज अधिकारी रँड याने जनतेवर अनन्वित अत्याचार केले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून पुण्याच्या चापेकर बंधूंनी त्याचा वध केला होता. चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली होती. स्वकियांवर अत्याचार करणाऱ्या परकियांचे निर्दालन करण्याची शिक्षा स्वकियाला होत असताना, बाल विनायकाच्या मनावर त्याचा परिणाम होणे स्वाभाविकच होते.

अन्यायी सरकारच्या विरोधात पेटून उठणे हे देखील स्वाभाविकच होते.

“खरे तर कोणतीही घटना घडते तेंव्हा, त्यामागे कारण आणि निमित्त हे दोन्हीही असते,” असे सावरकर म्हणतात.

साहजिकच चापेकर बंधूंना फाशी होणे हे निमित्त मात्र ठरले, क्रांतिकार्याची आग बाल विनायकाच्या मनात धुमसत होती हे त्यांच्या एका काव्यातूनच स्पष्ट होते.

कार्य सोडूनि अपुरे पडता झुंजत? खंती नको! पुढे ।।

कार्य चालवू गिरवीत तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे ।।

वाचकांनी एक बाब लक्षात घ्यावी की हे काव्य केवळ चापेकर बंधूंकरता रचलेले नसून, परकीय आक्रमकांशी लढताना, वीरगती प्राप्त झालेल्या प्रत्येक हुतात्म्या करता रचलेले हे काव्य आहे.

अधिक वाचा  समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले । विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्वमे ॥

बाल विनायकाने, सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला खरा, पण त्यांचे अंतिम ध्येय, कार्यपद्धती ही तात्कालिन क्रांतिकारकांपेक्षा थोडी वेगळी होती.

एखाद-दुसरा इंग्रज अधिकारी मारायचा आणि स्वतः फासावर जायचे हे धोरण सावरकरांना मान्य नव्हते असे दिसते. त्यांनी घेतलेली सशस्त्र क्रांतिची शपथ बरेच काही सांगून जाते. ही शपथ जर नीट समजली तर सावरकरांच्या चरित्रातील अनेक प्रसंगांचा उलगडा होतो असेच मला वाटते.

सर्वप्रथम त्यांनी काय शपथ घेतली होती ते पाहू.

यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून, मारिता मारिता मरेतो झुंजेन!!!!

या शपथेमध्ये, स्वतः झिजून किंवा आत्मक्लेश करून घेऊन मरण्यापेक्षा शत्रूला मारता मारता प्रसंगी मरण्याची झुंजार वृत्ती दिसून येते. या शपथेचा पूर्वभाग पाहुयात;

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत चापेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन!

थोडक्यात, सावरकरांचे क्रांतिसूत्र हे विजय प्राप्तीकरिता, संघर्ष, साम, दाम, दंड आणि भेद या सर्व मार्गांचा अवलंब करून ध्येयप्राप्तीपर्यंत कार्यरत राहण्याचे आहे.

क्रांतियुद्धामध्ये केवळ शत्रू संपवायचा म्हणून स्वतः किंवा सहकारी यांचा नाहक बळी देण्याचे सूत्र सावरकरीय नव्हे! इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास असेच सूत्र छत्रपती शिवरायांनी अवलंबलेले दिसते. उगाच युद्धआवेशाने आपल्या मावळ्यांचे आणि पर्यायाने स्वराज्याचे अधिक नुकसान करून न घेता योग्य वेळी माघार घेण्याचे ते सूत्र होते.

शत्रूला ठोकणे, पण गरज पडल्यास चकवणे, ठकवणे, भुलवणे, खोटी खोटी शरणागती पत्करणे या सर्व युक्ती-प्रयुक्ती वापरून आपले स्वतंत्र्यप्राप्तीचे ध्येय साध्य करणे हाच सावरकरीय क्रांतीचा गाभा आहे.

अधिक वाचा  चरित्र सावरकरांचे त्यांच्याच काव्यातून : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

हे सर्व करत असताना सशस्त्र क्रांती घडवून आणणाऱ्या क्रांतिकारकांची संघटना उभी करणे, त्यातील गुप्तता राखणे आदी बाबी त्यांनी सचोटीने हाताळल्या होत्या. त्यामुळेच बॅरिस्टरीचे निमित्त करून लंडनला जाणे पण, ब्रिटिश राजसत्तेशी प्रामाणिक राहण्याची शपथ न घेऊन सनद घालवणे, लंडनमध्ये हिंदी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय क्रांतीचे विचार पसरवणे, ध्वम (बॉम्ब) तयार करण्याचा विधी शिकून तो भारतात पाठवणे, पिस्तुले भारतात पाठवणे आणि त्याद्वारे भारतात क्रांती घडवून आणणे, अंदमानात सडून मरण्यापेक्षा, स्वतःची सशर्त सुटका करून घेणे आणि पुन्हा देशात येऊन कार्यरत होणे या गोष्टींचा उलगडा त्यांच्या शपथेचा अभ्यास केला तरच समजू शकतो असे मला वाटते.  

त्यांच्या एकंदरीतच क्रांतिकार्याच्या धोरणाचा उलगडा त्यांच्याच काव्य पंक्तीतून होतो …

सर्प विषारी मातृभूमीचा ये घेऊ चावा

अवचित गाठूनी, ठकवूनि, भुलवूनि कसाही ठेचावा

सावरकरीय तत्वज्ञान जरी, सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे असले तरी, हा पुरस्कार केवळ देशाच्या शत्रुविरोधात होणाऱ्या शास्त्राचाराचा होता. स्वकियांविरोधात सशस्त्र क्रांती करा असा संदेश त्यांनी कधीही दिला नाही. कारण कोणतेही आंतरिक वाद;  सुधारणा, प्रबोधन यातूनच सोडवणे हाच त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्ती नंतर त्यांनी आपली ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना विसर्जित केली.

आज ज्यांना कोणाला प्रस्थापित स्वकीय प्रशासनाविरुद्ध आंदोलने, क्रांती करावयाची असेल त्यांनी संविधानिक मार्गाचा अवलंब करावा हीच सावरकरीय क्रांतिसूत्रांची शिकवण आहे असेच मला वाटते.

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

[email protected]

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love