लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळ,विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरांच्या समग्र साहित्याचा वेध घेणारा लेखणी सावरकरांची हा कार्यक्रम निवारा सभागृहात २४ मे रोजी सादर करण्यात आला. सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व त्यांच्या विपुल साहित्यातून प्रकट झालेले आहे याचा पुनःप्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांनी अनुभवला.

सावरकरांची शिवआरती नृत्यातून सादर करत कार्यक्रमाची सुरूवात झाली.सावरकरांच्या देशप्रेमाची गीते,’ तुम्ही आम्ही सकल हिंदू!बंधू बंधू!’ तसेच एकात्म गीत सादर करण्यात आले.अंदमानच्या तुरुंगात असताना अचानक दिसलेली चंद्रकोर बघून  शशिलेखा म्हणत लिहिलेली ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’असे काव्य,सप्तर्षीसारखं दीर्घकाव्य ,सावरकरांनी लिहिलेली उर्दू गझल,बाजीप्रभूंचा पोवाडा सादर झाला.प्रसिद्ध ‘स्वदेशीचा फटका’, संन्यस्त खड:ग नाटकातील पद सादर करण्यात आले. सावरकरांनी फडासाठी ‘छंद नसे चांगला ‘ ही लावणीसुद्धा लिहिली आहे , ती ऐकायला,बघायला मिळाली.संगीत उ:शाप नाटकातील ‘धर्मांतर विरोधात बाणेदारपणे उभी असलेली नायिका’ हा महत्वपूर्ण भाग सादर झाला.

तसेच सावरकरांनी ‘सैन्यात शिरा ‘ म्हणून तरुणांना केलेलं आवाहन,भाषाशुद्धीची जनजागृती,साहित्य संमेलनातील ‘बोरू मोडा बंदुका, हाती घ्या’ हे जोशपूर्ण व्याख्यान,त्यांनी केलेली  ‘ध्वजासंबंधीची सूचना’, ‘विज्ञाननिष्ठ सावरकर’, त्यांचा  ‘अन्योक्ती ‘ हा साहित्यप्रकार अशा अनेक साहित्यप्रकारांचा मागोवा या कार्यक्रमातून घेण्यात आला.’देवी भगवतीचे जयोस्तुते’  हे स्तवन भरतनाट्यम  शैलीतून सादर करत कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाची संकल्पना ,संयोजन आणि संहितालेखन माधुरी अरुण जोशी यांचे होते.

कल्याणी साळेकर,तनया कानिटकर,ईशा वेलणकर यांनी नृत्य सादर केले. संजीवनी टोपे,सीमा भोळे,दीपा केळकर,पल्लवी पाठक,मकरंद घाणेकर,अस्मिता दाते,गजानन पिंगळे,मीनल जोशी,मानसी आपटे, मेधा गोखले,प्रदीप बर्गे,अनुपमा कुलकर्णी,केतकी देशपांडे, सतीश कारेकर अनुराधा खेर  या सर्व कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवली.

माजी नगरसेविका मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुण्या तर डॉ.प्रसाद पिंपळखरे( लेखक पु. भा. भावे  आणि गायक पं. गजाननबुवा पिंपळखरे यांचे नातू)अध्यक्ष यांच्या हस्ते नटराज आणि सावरकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने,लोककला अभ्यासक डॉ. भावार्थ देखणे,अभिनेते अरुण पटवर्धन,डॉ.अंजली जोशी,संस्कार भारती प्रांत पदाधिकारी मिलिंद भोळे, केंद्र पदाधिकारी डॉ.नयना कासखेडीकर आदी मान्यवर , कार्यकर्ते आणि सावरकरप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.

मधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.प्रसाद  पिंपळखरे यांनी आपले आजोबा भावे यांचा सावरकरांशी असलेला घनिष्ठ संबंध असल्याने सावरकरांचे पत्रांतून व्यक्त केलेले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव धनश्री देवी यांनी केले  तर सूत्रसंचालन  माधुरी जोशी यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *