काळे, टांकसाळे, राठिवडेकर यांना ‘मराठी रत्न’ पुरस्कार जाहीर


पुणे- मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या ‘मराठी रत्न’ पुरस्कारासाठी यंदा ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, साप्ताहिक सकाळच्या माजी कार्यकारी संपादक व ‘प्रथम बुक्स’च्या वरिष्ठ संपादक संध्या टांकसाळे व ‘अक्षरधारा’ बुक गॅलरीच्या सौ. रसिका आणि रमेश राठिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी या महाकवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा होणार्‍या ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ निमित्त या पुरस्कारांचे प्रदान केले जाते. यंदा करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे पुरस्कार दिले जातील, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली.

पुरस्काराचे यंदाचे 20 वे वर्ष असून यापूर्वी सुधीर गाडगीळ, मॉड्युलर सिस्टीमचे सौ. व श्री. जोशी व श्री. कुपर, प्रभाकर खोले, सुलभा तेरणीकर, मुकुंद संगोराम, सतीश कामत, डॉ. शैलेश गुजर, मृणालिनी ढवळे, श्रीधर लोणी, प्रल्हाद सावंत, आनंद आगाशे, सुजाता देशमुख, दीपा भंडारे, आनंद अंतरकर, विजय लेले, देविदास देशपांडे, चैत्राली चांदोरकर इत्यादींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी शुभेच्छापत्रे, दारावरील नावाची पाटी व सही मराठीत करा, मराठी वाचन संस्कृती जोपासा अशा पद्धतीचे प्रबोधनाचे कार्य संस्थेतर्फे केले जाते.

अधिक वाचा  सत्ता समतोलासाठी लोकशाही आणि उद्योगविश्‍वात समन्वय हवा

श्री. भानू काळे – 1995 मध्ये ‘अंतर्नाद’ या वाङ्मयीन-वैचारिक मराठी मासिकाची सुरुवात त्यांनी केली. शंकरराव किर्लोस्कर प्रतिष्ठान, प्रभाकर पाध्ये प्रतिष्ठान, मुंबई पत्रकार संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद व अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या पुरस्कारांनी सन्मानित. इचलकरंजी येथे 2008 मध्ये झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ‘तिसरी चांदणी’ (कादंबरी), कॉम्रेड (कादंबरी), बदलता भारत (प्रवासवर्णन), अंतरीचे धावे (लेखसंग्रह), रंग याचा वेगळा (संपादन), अजुनी चालतोची वाट इ.  त्यांची साहित्यनिर्मिती आहे.

संध्या टांकसाळे – प्रथम बुक्स ही अनेक भारतीय स्थानिक भाषांमध्ये मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारी ‘ना नफा-ना तोटा’ संस्था आहे. या संस्थेत ज्येष्ठ संपादक म्हणून संध्या टांकसाळे काम करीत आहेत. पत्रकारितेतील 35 वर्षांचा त्यांना अनुभव असून, ‘साप्ताहिक सकाळ’ त्या कार्यकारी संपादक होत्या. ‘स्त्री’ आणि ‘किर्लोस्कर’ मासिकापासून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. ज्येष्ठ संपादक विद्या बाळ यांच्याबरोबरच्या कामाचा मोठा अनुभव त्यांना मिळाला. पुढे त्या ‘स्त्री’ मासिकाच्या कार्यकारी संपादक बनल्या. काही वर्षे ‘अंगणवाडी’ मासिकाच्या मानद संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. पत्रकारिता व स्त्री चळवळ या संदर्भात अनेक देशांमध्ये परिसंवाद व चर्चासत्रे यांमध्ये सहभाग व विविध पुरस्कारांच्या मानकरी.

अधिक वाचा  सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार - अजित पवार

सौ. रसिका व श्री. रमेश राठिवडेकर – महाकवी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने ‘अक्षरधारा’ या पुस्तक प्रदर्शन संस्थेची सुरुवात केली. गेली 23 वर्षे ‘अक्षरधारा’ संस्थेने पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लक्षावधी वाचकांशी नाते जोडलेले आहे. तसेच साहित्य, संस्कृती आणि कलारंजनाच्या विविध उपक्रमांद्वारे वाचकांच्या मनात पुस्तकांबद्दल गोडी वाढवली आहे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथे असंख्य गावांमध्ये सुमारे सहाशे ग्रंथप्रदर्शने भरवली. मराठी दिवाळी अंकांचे प्रमुख विक्री केंद्र ‘अक्षरधारा’ आहे. ‘ज्ञानसूर्य’ मोबाइल व्हॅन सुरू करून गावोगावी नेली. पुण्यात ‘वाचक कट्टा’ सुरू केला. संपूर्ण भारतातून ‘बुक शॉप ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी ‘अक्षरधारा’ची निवड झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love