पूजा वनदुर्गांची : सावरपाडा एक्स्प्रेस – कविता राऊत

महाराष्ट्र लेख
Spread the love

नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या स्वयंप्रेरित ‘वनदुर्गां‘ची आपणास माहिती नसते. नवरात्रीच्या निमित्ताने अशाच काही वनदुर्गांचा परिचय…

सावरपाडा एक्स्प्रेस – कविता राऊत

डोंगरदऱ्यांनी वेढलेला सावरपाडा हा आदिवासी पाडा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे वनवासी गाव. त्या पाड्यावर अनवाणी चालणारी लाकूडफाटा गोळा करणारी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मातीचा धुराळा, मैलोन् मैल पाण्यासाठी रोजची वणवण अशा वातावरणात वाढलेली एक मुलगी, आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करते. ती म्हणजे सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत जिने आपल्या धावण्याने जगाचे लक्ष वेधले आणि गावाचे नाव जागोजागी झळकवले.

सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणारी कविता राऊत लांब पल्ल्याची भारताची धावपटू. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत कविताने ब्राझीलमध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. रियोत ती धावली मात्र यश पदरी आले नाही. पण नाशिकच्या ग्रामीण भागातून आलेल्या या मुलीची धाव आकांक्षांचे परिमाण बनली. कविता राऊत हिने २०१० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. सावरपाडा या ग्रामीण भागातून आलेली कविता हिचा प्रेरणादायी प्रवास इयत्ता पाचवीच्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकात आहे. पुढील पिढीला त्यातून नक्कीच प्रेरणा मिळावी या हेतूने लेखक संतोष साळवे यांनी तिचा प्रवास त्यात वर्णन केला आहे.

शाळेत शिकत असताना कविता धावण्याच्या स्पर्धेसाठी नाशिकला आली. अनवाणीच धावली. विजय मिळाला नसला तरी, पूर्वतयारी नसताना तिने केलेली कामगिरी प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या नजरेत भरली. त्यांनी कविताची प्रतिभा ओळखली आणि मग सुरू झाला तो कविता राऊत हिचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास

राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला आणि मागे वळून पाहिलेच नाही. प्रवास खडतर होता, पण तिला मिळालेली देवदत्त देणगी आणि जिद्द, चिकाटी आत्मविश्वास आणि नेमके मार्गदर्शन तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेले.

नाशिक येथे धावण्याचा सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कसरतही ती करत होती. तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला येणाऱ्या सर्व अडचणींमध्ये मदत करण्याचा विडाच उचलला. भोसला मिल्ट्री स्कूलमधील प्रवेश, तिच्या निवासाची व्यवस्था, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडा देत असताना तिच्या प्रशिक्षकानी तिला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भेटेल त्याला आवाहन केले. त्यात तिला त्याचा कमीपणा वाटणार नाही, याचीही काळजी पालकत्वाच्या नात्याने घेतली. तिचे आईबाबासुद्धा आपल्या लेकीच्या यशाचे श्रेय तिच्या प्रशिक्षकांना देतात.

कविताने १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेतून रियो स्पर्धेचे तिकीट मिळवले होते. कविताने अर्धमॅरेथॉनमध्ये १ तास १२ मिनिटे ५० सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला. त्या सोबतच दहा हजार मीटर अंतराच्या स्पर्धेत ३४ मिनिटे ३२ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणारी ती पहिली महिला अॅथलीट ठरली. २०१० मध्ये १० हजार मीटरच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळविले. त्याच वर्षी आशियाई स्पर्धेत १० हजार मीटरमध्ये तिने रौप्य पदक पटकावले. तिला २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील गौरविण्यात आले.

एका जिद्दीचा प्रवास काय असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कविता राऊत. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’  या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कवितासाठी विक्रम नवे नाहीत. पण याच कविताकडे एकेकाळी पायात घालण्यासाठी साधे बूटही नव्हते. डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन काट्याकुट्यांचे, खाचखळगे आणि डोंगरमाथे ती तुडवत होती. याच ‘रॉ टॅलण्ट’मधून आंतरराष्ट्रीय ख्यातीची धावपटू निर्माण झाली. आजही ती अंतर्बाह्य साधीभोळी, शिकण्यासाठी आसुसलेली आणि पाय जमिनीवर ठेवून ‘वाऱ्याच्या वेगात पळणारी’ मुलगी आहे. बघता बघता भारतीय तरुणाईची ती आयकॉन कधी झाली, हे तिलाही कळलं नसेल.

कविताचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास खडतर होता. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत योग्य प्रशिक्षण, हजारो तासांचा सराव हा जिद्दीने पूर्ण करत तिने यश मिळवले. वनवासी कल्याण आश्रमाचे काम सांभाळत कविता सध्या नाशिकलाच पुढील स्पर्धांचा सराव करत आहे. तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

अंजली तागडे

संपादक

(विश्व संवाद केंद्र, पुणे)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *