#Uday Samant : “राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) योग्य काम केले आहे. अवघ्या तीन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) आणि त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारसकर(Ajay Maharaj Baraskar) यांचा वैयक्तिक वाद आहे. यात सरकारला ओढू नये, सरकारने एवढे चांगले काम केलेले असताना सरकारला बदनाम करु नये”, अशी विनंती उदय सामंत(Uday Samant) यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले. सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केलेला असताना, आता आंदोलन कशासाठी? असा सवाल उपस्थित करत जरांगे हे कुणाचं तुणतुणं आहे, हे लवकरच समोर येईल, असे बारसकर महाराज म्हणाले. गेल्या तीन दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायेत. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
सामंत म्हणाले, मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही. त्यात सरकारला पडण्याची गरज नाही. त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठीचा लढा टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी जाहीर केले. त्यानुसार शनिवारपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहनही जरांगे यांनी केले असून, जिल्ह्याजिल्ह्यातील सकल मराठा समाजदेखील रास्ता रोको आंदोलन करणार आहे. राज्य सरकारने देऊ केलेले दहा टक्के आरक्षण मान्य नसल्याचे जरांगे यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. बुधवारी अंतरवाली सराटी येथे आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानुसार जरांगे यांनी आंदोलनांचे टप्पे जाहीर केले आहेत.