#दिलासादायक.. भारताची ही लस यशाच्या अगदी जवळ

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. भारतीयांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे, भारताची देशी लस म्हणून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सहकार्याने बायोटेक कंपनी जी ‘कोव्हॅक्सिन’ नावाची लस बनवत आहे, ती लस यशस्वी होण्याच्या अगदी जवळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार  ‘कोव्हॅक्सिन’च्या अंतिम टप्प्यातील चाचणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.  

भारत बायोटेक कंपनीने भारतीय औषध नियामक ‘ड्रग कंट्रोलर जनरल’ कडून ‘कोव्हॅक्सिन’ च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. डीसीजीआयने( DCGI) कंपनीला दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा मागितला आहे, जेणेकरून दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम काय आलेत याचा आढावा घेऊन तिसर्‍या टप्प्यातील चाचणीस मान्यता दिली जाऊ शकते. भारत बायोटेकने नुकताच यासाठी अर्ज केला आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 2 ऑक्टोबर रोजी डीसीजीआयकडे अर्ज केला आहे. कंपनीने अर्जात नमूद केल्यानुसार या अंतिम टप्प्यातील चाचणीत वय वर्षे १८  वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या २८,५००  लोकांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

कंपनीने केलेल्या अर्जानुसार, अंतिम टप्प्यात 10 राज्यांमधील 19 ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे. या यामध्ये  मुंबई, दिल्ली, पटना आणि लखनऊचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार  ‘कोवाक्सिन’ च्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्या अद्याप सुरू आहेत आणि काही ठिकाणी स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला नाही. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की कंपनीने आतापर्यंत पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांच्या अंतरिम डेटासह तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठीचा ‘प्रोटोकॉल’  डीसीजीआईकडे सादर केला आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) तज्ज्ञ समितीने (SECS) 5 ऑक्टोबर रोजी या अर्जावर चर्चा केली. समितीने आपल्या शिफारशीत म्हटले आहे की चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील रोगप्रतिकार आणि सुरक्षा संबंधित डेटाच्या आधारे योग्य डोस घेऊन अभ्यास सुरू केला पाहिजे. कंपनीने अशी आवश्यक आकडेवारी सादर करावी.

मिळालेल्या माहितीनुसार, शिफारस केलेल्या समितीच्या झालेल्या चर्चेमध्ये  दुसर्‍या टप्प्यातील चाचणीत सहभागी असलेल्या सर्व गटांनी लसीचा डोस योग्य प्रकारे सहन केला आहे आणि आतापर्यंत कोणतीही प्रतिकूल घटना किंवा गंभीर दुष्परिणाम नोंदवले गेलेले नाहीत, हे लक्षात घेतले आहे. सहसा लस ज्या ठिकाणी दिली जाते तिथे वेदना होतात तशा थोड्या  वेदना झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या गेल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. सर्व गोष्टी अनुकूल होत गेल्या तर या देशी लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीला लवकरचा सुरुवात होईल अशी अपेक्षा ठेवली जात आहे.   

देशातील तीन कोरोना कंपन्यांच्या लसिंमध्ये सध्या स्पर्धा सुरु आहे. कोवॅक्सिन व्यतिरिक्त, अहमदाबादस्थित जायडस कॅडिलाद्वारा विकसित केली जात असलेली ‘जायकोव-डी’ या लसीच्या देखील दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत.  तर ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका कंपनीने विकसित केलेली लसदेखील या चाचणीत प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. पुणेस्थित अग्रगण्य भारतीय लस उत्पादक सीरम इंस्टिट्यूट कोविशिल्ट या नावाने ती बाजारात आणणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *