यंदा भारतातून होणार १४० लाख टन विक्रमी तांदळाची निर्यात?


पुणे—यंदाच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१)  भारतातून सुमारे १४० लाख टन तांदळाची निर्यात करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असा अंदाज तांदळाचे निर्यातदार व फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला. मागील वर्षी सन २०१९-२० मध्ये देशाची तांदळाची निर्यात फक्त ९९ लाख टन इतकी झाली होती. ही निर्यात मागील आठ वर्षातील सर्वात कमी निर्यात होती. ह्यावर्षी ती कसूर भरून निघेल असा कयास असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा देशात सर्वत्र तांदूळ उत्पादित क्षेत्रात चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे देशात बासमती व इतर सर्व प्रकारच्या तांदळाचे भरघोस उत्पादन येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या तांदूळ निर्यातदार देशांच्या यादीत भारताच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडमध्ये यावर्षी अत्याल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे तेथील तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल. परिणामी थायलंडची जागतिक बाजारातील तांदळाची निर्यात त्यांच्या मागील अनेक वर्षांतील निर्यातीपेक्षा खूप कमी म्हणजेच ६०-६५ लाख टन इतकी होईल. त्याच बरोबर जागतिक क्रमवारीत थायलंड पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेला आपला अजून एक प्रतिस्पर्धी तांदूळ निर्यातदार देश म्हणजे व्हियतनाम तेथेही प्रमुख तांदूळ उत्पादित क्षेत्रात असमाधानकारक पाऊस झालेल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे तेथीलही तांदूळ उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. त्यामुळे सहाजिकच निर्यात सुद्धा खूप कमी होईल. या प्रमुख कारणांमुळे भारत यावर्षी आत्तापर्यंतची अव्वल निर्यात नोंदवेल असेही शहा यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्वाधीनतेपासून संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना स्वावलंबी भारतात रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक

भारत मुख्यत्वे इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती तांदळाची निर्यात करतो. तर प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल या राष्ट्रांना नॉन बासमती तांदूळ निर्यात करतो. परंतू ह्यावेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळेही ह्यावर्षी निर्यातीत वाढ होईल. मागील वर्षी आपली नॉन बासमती तांदळाची निर्यात ही मागील आठ वर्षातील सर्वात कमी झाली होती. परंतू ह्यावर्षी प्रतिस्पर्धी देशांतून कमी निर्यात व आपल्या देशात येणारे तांदळाचे जास्त उत्पादन यामुळे आपली निर्यात मागील वर्षीच्या सुमारे ४२% इतकी वाढेल. या निर्यात वाढीमुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल.

गेल्या वर्षी देशाची नॉन बासमती तांदळाची निर्यात खूप कमी झाली होती. त्याअनुषंगाने राजेश शहा यांनी फाम च्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदनाद्वारे निर्यात वाढीसाठी उपाययोजना करण्यासाठी विनंती केली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love