‘स्त्रीस्वातंत्र्यम् अर्हति’:हेरवाड – अनिष्ट रूढींच्या त्यागाचा मानबिंदू


कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने केलेला विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव खर्‍या अर्थाने स्तुत्य आणि अनुकरणीय सुद्धा आहे.

१८२९ मध्ये राजा राम मोहन राय आणि लॉर्ड विलियम बेन्थिक यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भारतातील सतीची प्रथा बंद झाली. आणि तरीही १९८७ साली रूपकुंवर आणि १९९९ ला चरण शाह उत्तर प्रदेशात सती गेल्याची वार्ता कानावर आली. तोपर्यंत आणि त्यानंतरही अनेक स्त्रिया दबावाने, नाईलाजाने किंवा परिस्थितीमुळे स्वतःहून सती गेल्याच्या घटना दबक्या आवाजात कानावर येतच होत्या.

हळूहळू सतीची प्रथा कमी झाली आणि विधवा स्त्रीची बोळवण केशवपन करून लाल आलवणात केली गेली. लहान वयात पतीच्या निधनानंतर पुढचं संपूर्ण आयुष्य समाजाच्या बोचर्‍या नजरा झेलत, तारुण्याचे सगळे भोग एकटीने सहन करत जगणं विधवेला खरोखरच कठीण होत होतं आणि मग त्यातूनच कोणी स्वेच्छेने, तर कोणी घरच्यांच्या दबावाने भुंड्या कपाळावर लाल आलवणाचा पदर घेत होती. कधी गरिबीमुळे उदरनिर्वाहाची चिंता, कधी कुण्या दिराची, सासर्‍याची वाईट नजर, कधी लहान वयातच लागलेला वांझपणाचा शिक्का तर कधी स्वतःच्याच देहवासना काबूत ठेवण्यासाठी स्त्रिया काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सोवळ्या होत राहिल्या. काकस्पर्श, पांघरूण यासारख्या मराठी चित्रपटांमधून या अपरिहार्यतेचं विदारक चित्रण आपण अनुभवलं आहे.

अधिक वाचा  #Sharad Pawar : माझे वय काढत बसू नका; हा गडी थांबणारा नाही- शरद पवार

या प्रत्येक वेळी जाचक रुढी, परंपरा याविरुद्धचे कायदे अस्तित्वात असतातच की! पण कोणतीही रूढी केवळ कायदे करून, कागदोपत्री बदलून समाजपरिवर्तन होत नाही. त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणणं हे फार महत्त्वाचं आहे. आज पुण्या – मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विधवा प्रथा कधीच मागे पडल्या आहेत. आता कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र पतीच्या निधनानंतर सुद्धा शहरांमध्ये अबाधित राहतं आहे. आधुनिक युगात राहणारी स्त्री आज पोषाखाला अनुसरून कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र न घालण्याएवढीही मुक्त आहे. पण अजूनही खेड्यापाड्यामधली परिस्थिती खूप वेगळी आहे. तिथेही स्त्रिया शिकल्या, अगदी मिलिटरी मध्ये जाण्याएवढी मजलही त्यांनी मारली आहे. पण जुन्या रूढींना आजही तिथे प्राधान्य दिलं जातं. काही अपरिहार्य कारणं असतीलही, पण ग्रामीण स्त्री अजूनही आधुनिक विचारांपासून कोसो दूर आहे, हे सत्य कटू असलं तरी मान्य करावंच लागेल.

अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का

आणि म्हणूनच हेरवाड गावाने घेतलेला विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय विशेष उल्लेखनीय आहे. कोणताही बदल समाजाच्या सगळ्यात पहिल्या स्तरावरूनच पुढे जात असतो. आपल्या संस्कृतीचा प्रवाह सुद्धा ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे वाहणारा आहे. आणि म्हणूनच संस्कृतीच्या पहिल्या पायरीवरचा हा बदल संपूर्ण समाजाला दिशा देणारा ठरेल, यात शंकाच नाही.

धर्माच्या नावाखाली लादल्या गेलेल्या अनिष्ट रूढींचा त्याग करणाऱ्या हेरवाड गावाला महाराष्ट्र भूमीवरचा मानबिंदू म्हणावं लागेल, हे नक्की! –

आसावरी देशपांडे जोशी

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love