Ajitdada is your right place

अजितदादा हीच तुमची योग्य जागा आहे, पण थोडा उशीरच केला : का म्हणाले असे अमित शाह?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे—अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यक्रमात माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात,  हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि एकच हशा पिकला. (Ajitdada is your right place)

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते रविवारी  केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. तयावेळी ते बोलत होते.  पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात करताच अजितदादांचा उल्लेख करून त्यांनी इथे (भाजपासमवेत) याला उशीर केला असल्याची टिप्पणी केली. तसेच तुम्ही आता योग्य ठिकाणी येऊन बसला आहात, असे सांगितले. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तर अजित पवार यांनी आपल्या जागेवरून हात जोडून अमित शाह यांना अभिवादन केले.

अजित पवारांकडून अमित शाहंचे तोंडभरून कौतुक

दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच मी वेगळा निर्णय घेण्यामागे काय कारणे आहेत, असा अनेकांना प्रश्न पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेच देशाचे नेतृत्व करू शकतात, असे ते म्हणाले.

शाहू, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचं तोंडभरुन कौतुक केलं.

केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणीही  धाडस केलं नाही. हे धाडस  फक्त अमित शहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, असंही ते म्हणाले. मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

“अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,” असेही अजित पवार यांनी पुढे म्हणाले.

अमित शाह यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर देशपातळीवर सहकार चळवळीची घोडदौड सुरू- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमित शाह यांचे महाराष्ट्रावर अधिक प्रेम असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेठ रोवली गेली. राज्याच्या गावागावात सहकार चळवळ पोहोचलेली असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्याचा मोठा वाटा आहे. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची सूत्र हातात घेतल्यापासून देशपातळीवर सहकार चळवळीची घोडदौड सुरू आहे. नवीन कायदा मंजूर करण्यात आला. आज मंत्रालयाचे नवीन पोर्टल सुरू होत असताना त्याचे अनावरण करण्यासाठी त्यांनी सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात पोर्टलचे उद्घाटन केले. यापूर्वीचे नेते इन्कम टॅक्स संदर्भात सातत्याने केंद्राकडे जायचे आणि हात हालवत खाली यायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहा यांना भेटलो. त्यावेळी शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले म्हणजे त्यांना इन्कम टॅक्स भरावे लागणे चुकीचे असल्याचे शहा यांनी सांगितले. निर्णयात बदल केला आहे. वर्षांनुवर्षे कोणाला जमले नव्हते ते काम करत इन्कम टॅक्स बंद केला. शहा यांचे नेतृत्व सहकारातून घडले, असे फडणवीस म्हणाले.

अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत, असे म्हटले जाते. ते खरे असले तरी महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. अमित शाह यांचा जन्म मुंबईत झाला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपला पहिला कारखाना महाराष्ट्रातच उघडला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

शहा यांचा जन्म मुंबईचा आहे. त्यामुळे कर्मभूमी गुजरात असली, तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी मुंबईत व्यवसाय केला आहे. सहकारच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रत्येक शिष्टमंडळाला भेटतात. शेवटच्या माणसापर्यंत सहकार पोहोचेल. तेव्हाच समृद्धी होईल. सर्व सोसायट्या पुजनर्जीवीत करण्याचे काम शहा यांनी हाती घेतले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

शिंदे- फडणवीसांबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा?

अमित शहा यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेतली. मंत्रीमंडळाच्या विस्तारासंदर्भात ही बैठक होती, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते.  त्यासाठी त्यांचे शनिवारी पुण्यात आगमन झाले. सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमानंतर पुण्यातील वेगवेगळ्या घटकांबरोबर ते चर्चा करणार होते. काही नेत्यांशीही ते संवाद साधणार होते. मात्र हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले. पुण्यात बूथ कमिटी सदस्य आणि काही नेत्यांच्या भेटी असा हा कार्यक्रम होता. तो रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेतली. मंत्रीमंडळाच्या विस्तारासंदर्भात ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या तिघांमध्ये त्यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी या चारही नेत्यांची ४० मिनिटे चर्चा झाली. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत आढावा, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. नव्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार तर अजितदादा गटाला दोन मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा गट सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे दरम्यान, अमित शहा यांनी शनिवारी सॅलसबरी पार्क येथील त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्याचे समजते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *