भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

राजकारण
Spread the love

पुणे —पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चेने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही, उलट मी विरोधकांना आवाहन करेल की आपापले पक्ष संभाळा. येणारी महापालिका निश्चितच आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे असे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

मतदारसंघासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्षांना केली होती. पण याबाबत टाळाटळ करत निवडक लोकांनाच विचारपूस होत असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचं बोलले जात आहे.  बापट यांनी मात्र नगरसेवक फुटण्याच्या या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भाजपचे नगरसेवक कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विकास कामासाठी निधी मिळत नसल्यामुळे काही नगरसेवक नाराज जरूर आहेत. परंतु ते पक्ष सोडून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महापालिकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे नगरसेवकांना निधी देण्यासाठी सध्या अडचण निर्माण होत आहे. परंतु कुठल्याही नगरसेवकाच्या वार्डातील विकास कामे थांबणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ आणि नगरसेवकांना पुरेसा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु नगरसेवक पक्ष सोडून जाणार आहेत, अशी जी काही चर्चा होत आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही, असे खासदार बापट यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली होती. त्यावेळी भाजपाने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षातील नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली होती. आता मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच अजित पवार यांनीही पुणे महानगर पालिका पुन्हा खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *