पुणे: वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

पुणे(प्रतिनिधी)–वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील तलाठ्यासह त्याच्या खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली.

सुनील भिकाजी सातोसे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून, नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०) या खाजगी मध्यस्थालाही या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पुणे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यानंतर चऱ्होली बुद्रुक येथील त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर वडिलांची आणि काकांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदाराने डिसेंबर २०२५ मध्ये अर्ज दिला होता. मात्र, तलाठी सातोसे याने ही नोंद करण्यासाठी तक्रारदाराला वारंवार कार्यालयाच्या चकरा मारायला लावल्या. २९ मे रोजी तक्रारदार पुन्हा चौकशीसाठी गेले असता, सातोसे याने या कामासाठी सुरुवातीला १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीनंतर ही रक्कम ८० हजार रुपये ठरवण्यात आली.

अधिक वाचा  MIT-ADT University Hosts Life-Saving Blood Donation Campaign on 42nd Foundation Day of MAEER'S Group of Institutions

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १ जून रोजी पुणे एसीबीकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीने ४ जून रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता, सातोसे याने पुन्हा तडजोड करत ७० हजार रुपये मागितले आणि हे पैसे त्याचा खाजगी एजंट नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार, सोमवारी दुपारी चऱ्होली बुद्रुक येथील तलाठी कार्यालय परिसरात एसीबीने सापळा रचला. सातोसेच्या सांगण्यावरून भोकरेने तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही झडप घालून अटक केली.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी लाच न देता तातडीने एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love