पुणे महापौर कार्यालय आणि आरएसएस मुख्यालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Pune Municipal Corporation bomb threat
Pune Municipal Corporation bomb threat

पुणे(प्रतिनिधी)–पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेची मुख्य इमारत तातडीने रिकामी करण्यात आली असून, पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) परिसरात कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर १० जून रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये केवळ पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय आणि विधान भवन उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे. ई-मेलमध्ये आयईडी (IED) बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, स्फोटासाठी काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

अधिक वाचा  Prashant Jagtap Resignation : पुणे राष्ट्रवादीत खळबळ: शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा तडकाफडकी राजीनामा

या धमकीच्या मेलच्या शेवटी ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ असा उल्लेख असून, त्यामध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चाही संदर्भ देण्यात आला आहे. यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. हा ई-मेल खरोखरच संबंधित संघटनेने पाठवला आहे की कुणीतरी जाणूनबुजून या नावाचा वापर करून खोडसाळपणा केला आहे, याचा तपास पोलीस आणि सायबर विभागाकडून युद्धपातळीवर केला जात आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार तातडीने पावले उचलण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मुख्य इमारत खाली करण्यात आली असून, कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जोपर्यंत बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक वाचा  चिनाब पूल : भारताच्या सामर्थ्याचं आणि अदम्य इच्छाशक्तीचं एक जिवंत प्रतीक

सध्या बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि सायबर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीच्या कानाकोपऱ्याची तपासणी केली जात आहे. आतापर्यंतच्या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित संवेदनशील परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला आणि त्यामागील व्यक्तीचा हेतू काय होता, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीस यंत्रणेसमोर आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love