Post Views: 2,152
पुणे(प्रतिनिधी)- परीक्षेचा पेपर फुटल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून दहा हजार ऊपये आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, परीक्षा आयोजित करण्यासाठी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट व्हावे, मंत्र्यांच्या नातलगांना वा जवळच्या मित्रांना अशी टेंडर मिळता कामा नयेत तसेच एनसीईआरटीच्या पाठ्यापुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ पुन्हा समाविष्ट करण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांचे ठराव कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात गुरुवारी मांडण्यात आले. विद्यार्थ्यांचा एकच आवाज; शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आज, युवा एकता झिंदाबाद, अशा घोषणा देत ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली एकवटलेल्या हजारो विद्यार्थी व युवकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर गुरुवारी दणाणून सोडला. नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने अभिजीत दीपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी. अॅड असीम सरोदे, नामदेवराव जाधव यांच्यासह पुण्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी सहभाग घेतला. त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनीही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांचाही लक्षणीय सहभाग
दुपारी चारच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबरच ज्येष्ठांचाही यातील सहभाग उठून दिसत होतात. विद्यार्थ्यांच्या हातात असलेल्या फलकांवरील मजकूर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता. पेपर लीक सरकार, लीक इन इंडिया, आमचे भविष्य आमचा अधिकार, सर्वांना शिक्षण, सर्वांना काम, असा आशय या फलकांवर लिहिलेला होता. या वेळी विद्याथ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अन् विद्यार्थ्यांची गर्दी उसळली
धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, नरेंद्र मोदी उत्तर द्या, युवा एकता झिंदाबाद, यांसारख्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. पावणे सहाच्या सुमारास सोनम वांगचूक यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यानंतर अभिजित दीपके हेदेखील आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. त्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी उसळली. तरुणांचा उत्साह टीपेला पोहोचला.
मंत्र्यांच्या नातलगांना परीक्षांचे टेंडर नको आंदोलनामध्ये प्रामुख्याने पाच मागण्या करण्यात आल्या. पेपर फुटल्यास विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, परीक्षा प्रक्रियेत कडक ऑडिट व्हावे, मंत्र्यांच्या नातेवाईकांना टेंडर देऊ नयेत, परीक्षेचा निकाल एका ठराविक मुदतीतच जाहीर झाला पाहिजे, विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च शासनाने उचलावा, तसेच एनसीईआरटीच्या पाठ्यापुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ पुन्हा समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांचे ठराव या वेळी मंजूर करण्यात आले.
धार्मिक द्वेषाला बळी पडणार नाही
सरकारचे धार्मिक राजकारण यापुढे चालणार नाही. तऊण पिढी कोणत्याही हिंदू-मुस्लीम किंवा धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, असा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.
हक्कासाठी लढणे म्हणजे अराजकता का?: दीपकेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
अभिजीत दीपके यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजकता पसरवत आहेत, असे मुख्यमंत्री महोदय म्हणतात. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे, की हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? आम्हाला संविधान माहीत आहे का, असेही ते विचारतात. मात्र, चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिले आहे, असा टोलाही दीपके यांनी लगावला.
- सत्य-अहिंसा हाच आंदोलनाचा मार्ग : सोनम वांगचूक
सोनम वांगचूक म्हणाले, शिक्षण आणि पर्यावरणावर सरकारने काम केले पाहिजे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे गेलो, तरच खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या दिशेने जाता येईल. सत्य आणि अहिंसा हाच आमच्या आंदोलनाचा मार्ग आहे. देशातील माध्यमांना आज स्वातंत्र्य नाही. पंतप्रधानांनी मन की बातमध्ये माध्यम स्वातंत्र्यावर बोलले पाहिजे. कुठल्याही सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन नाही. तर कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणारे सरकार आपल्याला हवे आहे, अशी अपेक्षा त्यांनी क्यक्त केली. शिक्षण धोरणात अनेक त्रुटी असल्याची टीकाही त्यांनी केली.
50% LikesVS
50% Dislikes













