भाजपमध्ये इन्कमिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दक्षिण भारतात भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अशोक चव्हाण यांच्या नावाची देखील पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल झाले आणि पुन्हा पत्रकार मंडळींनी पहाटेचा गजर लावून तयार झाले. अजूनही अनेक तर्क वितर्क सुरूच आहेत. त्यामध्ये डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी पंधरा दिवस थांबा दोन ठिकाणी मोठे बॉम्बस्फोट होतील असे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी जुळून घेण्याची भाषा केल्यामुळे धनंजय मुंडे देखील भाजप प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
देशात जसे भाजप इनकमिंग सुरू झाले आहे तसेच ते राज्यात देखील सुरू होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष करून लोकसभा 2024 च्या आत मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नेते जातील असं बोललं जाते. आता हे नेते भाजप प्रवेश करतील की नाही याचे उत्तर आगामी काळात मिळणार असलं तरी चर्चा कुणाच्या रंगत असतात आणि का रंगत असतात हे पाहणे देखील गरजेचे आहे. पाहुयात कोणकोणत्या नेत्यांचे भाजपात इनकमिंग होण्याच्या चर्चा आहेत आणि त्या का आहेत ते.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे- चंद्रकांत दादा पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात बोलताना अमोल कोल्हे भाजपमध्ये येणार असतील तर आढळरावांऐवजी त्यांना तिकीट देण्यात येईल अशा आशयाचे वक्तव्य केलं होतं. मात्र केवळ भाजपकडूनच नाहीत कोल्हेंकडूनही वेळोवेळी भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात संकेत दिले जात असल्याचे सांगण्यात येतं. नुकत्याच पार पडलेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीदरम्यान एका सभेमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याचा आरोप अमोल कोल्हे यांच्यावर झाला होता. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिर्डी येथे मंथन बैठक झाली त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आजारी असूनही हजर होते पण कोल्हे यांनी मंथन शिबिराला दांडी मारली. गुजराती निवडणुकांसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देखील अमोल कोल्ह्यांचे नाव नव्हतं. त्यांची भाजप प्रवेशाची केवळ आता औपचारिकताच बाकी राहिल्याचं बोललं जातं. पुणे जिल्ह्यात वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडे शिवसेनेशिवाय नसलेला दुसऱ्या पर्याय हा अमोल कोल्हें आहे. त्यामुळे कोल्हेंच्या भाजप प्रवेशामागील हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. त्याचबरोबर अमोल कोल्हेंना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करून मिळालेली लोकप्रियता आणि त्यांच्या या इमेजचा भाजपचा हिंदुत्वाला होणारा फायदा यामुळे देखील भाजप कोल्हेंना पक्षात सामील करून घेण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जाते.
भाजप प्रवेशावरून सतत चर्चेत येणारच दुसरं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याची माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. अशोक चव्हाण हे नाकारत असले आणि अनेकदा या चर्चांवर मौन बाळगले असले तरी त्यांच्या अनेक संकेतांमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबायचं नाव घेत नाहीत. शिवसेनेतील बंडखोरी नंतर झालेल्या विश्वास दर्शक ठरावाला अशोक चव्हाण उशिरा पोहोचले होते. त्यानंतर राजासत्ता पालट होऊन देखील अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघांमध्ये 183 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटर ग्रीड प्रकल्पाला शिंदे फडणवीस सरकारने 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता . त्याचबरोबर काँग्रेसकडूनही त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतल्यानंतर कोणती विशेष अशी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशोक चव्हाण देखील काँग्रेसमध्ये राहण्यासाठी उत्सुक नसल्यास बोलल जाते. त्यातच एक मराठा फेम मराठवाड्यातील एक अनुभवी नेतृत्व यामुळे देखील भाजप अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशासाठी आग्रही असल्यास सांगण्यात येते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना अल्टरनेटीव्ह म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखाच दुसरा एक अनुभवी नेता म्हणून देखील भाजप ‘हाय कमांड’ अशोक चव्हाण यांच्याकडे पाहत असल्याचं सांगण्यात येते.
तिसरे नाव आहे ते म्हणजे विश्वजीत कदम यांचं. 2023 च्या जानेवारी महिन्यात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात विश्वजीत कदम देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि विश्वजीत कदम यांच्या भाजपप्रवेशनाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. 2014 ला पुणे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरच विश्वजीत कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर अनेकदा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होतच राहिल्या. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण ठरत होतं ते म्हणजे काँग्रेस पक्ष. पतंगराव कदम हे काँग्रेस मधील वजनदार नेते असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने संधी दिली नव्हती अशी सल आजही कदम घराण्याच्या समर्थकांमध्ये आहे काँग्रेस पक्षामध्ये संधीची असलेली उपेक्षा पाहता विश्वजीत कदम केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे चित्र निर्माण झाले. त्याचबरोबर भाजपच्या मोठ्या नेत्यांनी विश्वजीत कदम यांना दिलेला ‘सॉफ्ट कॉर्नर’ हा देखील कुटुंबात विषय आहे. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद असतानाही भाजपने ही पोटनिवडणूक बिनविरोध केली होती तर 2019 मध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी पूर्ण तयारी केली असतानाही भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला होता.
पश्चिम महाराष्ट्रातील विस्तारासाठी असलेली तरुण नेत्याची गरज त्याचबरोबर साखर कारखाना शैक्षणिक संस्थांचे जाळं, राज्य पातळीवरती युवकांचं संघटन या बाबींमुळे भाजपला विश्वजीत कदम हवे असल्याचे बोलले जाते.
भाजप प्रवेशामुळे चर्चेत असणारा चौथा महत्त्वाचं नाव म्हणजे जयंत पाटील यांचे. 1990 पासून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून येणारे जयंत पाटील आज राष्ट्रवादीच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे 1999 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी अर्थमंत्री होऊन राज्यातील सर्वात तरुण अर्थमंत्री म्हणून नाव मिळवणाऱ्या जयंतराव पाटलांनी राष्ट्रवादी सत्तेत असताना जवळपास सर्वच महत्त्वाची मंत्रिपद भोगली आहेत. मात्र उपमुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्रीपद ही दोन्ही पद अजूनही जयंत पाटलांना मिळवता आलेली नाहीयेत. उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांना अजित पवारांना मागे सारावे लागणार आहे . जे सध्या अशक्यप्राय असल्याचे जाणकार सांगतात तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल का याबद्दल अजूनही शाश्वती नाहीये. थोडक्यात राष्ट्रवादीत त्यांची करिअर ग्रोथ थांबली आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्यासाठी पक्ष बदलण्याचाच ऑप्शन असल्याचं बोललं जाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजारामबापू घराण्याच्या तिसऱ्या पिढीने राजकारणात घेतलेली एन्ट्री. जयंत पाटलांच्या मुलाने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यातच सध्या राजारामबापू घराण्याकडे केवळ इस्लामपूर हा एकच विधानसभा मतदारसंघ आहे जिथून जयंत पाटील निवडून येतात. इस्लामपूर मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो. त्या मतदारसंघातून आपल्या मुलासाठी जयंत पाटील प्रयत्न करत असल्याचा सांगितलं जाते. मात्र जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील राष्ट्रवादीकडूनच लढतील का याबाबत शंका व्यक्त केली जाते. मागच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे ना फोटो होते ना राष्ट्रवादीचे चिन्ह होतं. त्याचवेळी मिशन ४५ अंतर्गत भाजपने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मात्र भाजपकडे या मतदारसंघासाठी तुल्यबळ उमेदवार मात्र नाहीये. अशा परिस्थितीत भाजपकडून जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी प्रयत्न चालू असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
भाजप प्रवेशासंदर्भात चर्चेत असलेलं पाचवं नाव म्हणजे अमित देशमुख. भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली असल्याची चर्चा आहे. राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं काही दिवसांपूर्वी भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे देशमुख बंधूंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या होत्या. गेल्या काही वर्षातील घडामोडी बघितल्या तर देशमुख बंधू भाजपच्या राज्यातील शिवसेनेतृत्वाशी सलोख्याचे संदर्भ राखून असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळतात. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी लातूर ग्रामीणच्या जागेचे उदाहरण घेता येईल. लातूर ग्रामीण जागेवरून स्वर्गीय विलासराव देशमुखांचे सर्वात धाकटे पुत्र धीरज देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते अशावेळी भाजपने त्यांनाही सीट बाय दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भाजपनेय सीटवर चांगली ताकद असताना देखील ही सीट जागा वाटपात शिवसेनेला देऊ केली होती. त्यावेळेस फडणवीस आणि लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं गेलं. ही राजकारणातली सर्वात मोठी फिक्सिंग असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार निलंगेकर यांनी केला होता. त्यामुळे भाजपशी असलेला ताळमेळ देशमुख बंधूंना भाजपमध्ये घेऊन येईल असे बोलले जाते.
भाजप प्रवेशासंदर्भात चर्चेत असलेले सहावे नाव म्हणजे धनंजय मुंडे यांचे. धनंजय मुंडे जरी आज राष्ट्रवादीत महत्त्वाचे नेते असले तरी वंजारी समाजाचं महाराष्ट्राच्या विशेषतः मराठवाड्याच्या राजकारणात असलेले स्थान पाहता त्यांची ताकद त्याहूनही जास्त असल्याचे बोलले जाते. त्यातच पंकजा मुंडेंना भाजपमध्ये डावललं गेल्याने त्यांची वंजारी वोट बँकेवरील पकडही कमी झाली आहे. अशावेळी वंजारी वोट बँकेवरची पकड पुन्हा मिळवण्यासाठी भाजपला आता पुन्हा एका मजबूत वंजारी नेत्याची गरज असणार आहे जिथे धनंजय मुंडे यांचे नाव परफेक्ट बसतं. त्यातच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणींच्या लढाईमध्ये सद्यस्थिती धनंजय मुंडे वरचढ असल्याचे दिसतात आणि अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंना बीड लोकसभेसाठी लढवण्याची चाल भाजप खेळू शकते. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांसोबत जुळून घेण्याची केलेली भाषा पाहता धनंजय मुंडे बीड मधून खासदार, परळीतून पंकजा मुंडे आमदार आणि पाथर्डीतून प्रीतम मुंडे आमदार असेही समीकरण अनेक जण लावत आहेत असो तर वंजारी समाजाचा फॅक्टर पूर्ण ताकदीने लावायचा असेल तर भाजपला धनंजय मुंडे यांची गरज ही भासणारच आहे.
भाजप प्रवेशा संदर्भात चर्चेत असलेला सातवा नाव आहे काँग्रेसचे अस्लम शेख यांचे . असलम शेख हे काँग्रेसचे मुंबईतील सध्याचे सर्वात प्रमुख मुस्लिम चेहरा आहेत. असलम शेख हे मालाड पश्चिम मतदार संघातून 2009 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील देण्यात आलं होतं. मात्र 2019 च्या निवडणुकीपूर्वीच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वीच असलम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा जाहीर होत होत्या. त्यावेळी असलम शेख यांचे काही फोटो चक्क भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बॅनरवर होते. आणि शेख यांच्या बॅनर वरून काँग्रेसचा पंजा देखील गायब झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चा थांबल्या. मात्र सरकार पडल्यानंतर त्यांची भाजपशी असलेली जवळीक पुन्हा वाढल्याचे बोलले जात आहे. हे भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबरोबर फडणवीसंना भेटायला त्यांच्या सागर या निवासस्थानावर गेल्याने पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने असलम शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील करत आलेत. आरोपांच्या माध्यमातून अस्लम शेख यांच्यावर दबाव निर्माण केल्याचे देखील बोलले जाते. दुसऱ्या बाजूला येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका भाजपला मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज यामुळे देखील भाजप असलम शेख यांच्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जाते.