चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? – जयंत पाटील टोला


पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वप्ने पाहण्याचा छंद जडला आहे. त्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात. मात्र, महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.  

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांतदादा म्हणतात. मग पंतप्रधानांनाही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, असा चिमटा जयंत पाटलांनी काढला. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता...

दरम्यान,  लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती ठरवावी लागेल. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. पण परिस्थिती थोडी बरी आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत

पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही मतभेद  नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजितदादा पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्रं रंगवलं जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही छत्रपती संभाजीराजेंची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्यातील सर्व मराठा नेत्यांनी आरक्षण मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. त्यात संभाजीराजे अग्रेसर आहेत. पण हा प्रश्न केंद्राच्या हातात आहे. लोकसभेत घटना दुरुस्ती करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भूमिका पोहोचवण्याचं काम संभाजीराजे करत आहेत, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील आहे. तो सुटायला हवा, असा सगळ्यांचाच आग्रह आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान,चंद्रकांत पाटील म्हणतात ते सर्व खरं असतं असं नाही. त्यामुळे त्यावर भाष्य न केलेलं बरं असा टोलाही त्यांनी लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love