उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या …

Uncategorized
Spread the love

पुणे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, ‘उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले.

शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. नंतर रविवार पेठेतील विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आल्या असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी, ‘तुम्हाला वाटतं का? ‘ असा प्रतिप्रश्न केला. त्या पुढे म्हणाल्या, ‘आमच्या वाटण्यावर काही नाही. ते राजसाहेबच ठरवतील. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकटे पडले आहेत, त्यामुळे राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे का? या प्रश्नावरही त्या म्हणाल्या, ‘माहिती नाही…’ पण पॉझ घेतल्यावर पुन्हा उत्तरल्या, ‘उद्धव ठाकरे यांनी साद घातली, तर येऊ देत; मग बघू’, असे त्या म्हणाल्या. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता आली, तर पुण्यातील रस्ते चांगले होतील, ‘ अशी मिस्कील टिप्पणीही त्यांनी पुण्यातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत बोलताना केली.

‘अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील सर्वाधिक मतदार युवक असून, या दोन्ही युवा नेत्यांना युवकांचे प्रश्न माहिती आहेत.या दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, ‘ असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. ‘घरात बसून केवळ गृहिणीपद सांभाळण्यापेक्षा आपल्यातील कलागुण आणि आवड जोपासत महिलांनी उद्योग व्यवसायात यशाचे शिखर गाठावे, ‘ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्र काही मागासलेले राज्य नाही. कोणत्याही बाजूने राज्याची सीमा सोडून गेलो तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध प्रदेश या सगळ्या ठिकाणी आपल्याला गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करीत नाहीत? माझ्या पतीच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, ‘ अशी मिस्कील टिप्पणी त्यांनी पुण्यातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नावर केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *