पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तांमार्फेत त्यांच्या वक्तव्यांची तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण असल्याची टिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर सोमवारी केली आहे.
वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्या भाषणात भोंग्याचा विषय आणि शरद पवार यांचेवरील टिका हे दोन विषय सोडून दुसरे काही राज्यासमोरील प्रश्नांवर चर्चा नाही. समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षेाभक वक्तव्ये केल्याप्रकरणी तसेच त्यांनी दिलेल्या इशाराच्या अनुषंगाने मंगळवारी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी ही सल्लामसलत करुन कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर चार मे रोजी राज्यात कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे टिकून राहील याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वांनी शांततेने राहणे आवश्यक असून पोलीस विभाग परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहे. कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था उल्लंघन करुन चालणार नसून वेगवेगळया आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत.
सर्वाच्च न्यायालयाने लाउडस्पीकरबाबत निर्णय देताना सांगितले आहे की, रात्री दहा ते सकाळी सहा यादरम्यान लाऊडस्पीकर वाजविण्यात येऊ नये. तसेच उर्वरित वेळेत पोलीसांची परवानगी घेऊन लाऊड स्पीकर लावण्यात यावा. त्यामुळे सर्वाच्च न्यायालयापेक्षा राज ठाकरे मोठे नसून त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्याचा अधिकार नाही. विशिष्ठ समाजाला डोळयासमोर ठेवून त्यांची भूमिका मांडण्याची पध्दतीचा परिणाम केवळ मुस्लीम समाजावर होणार नाही तर तो विविध समुदायांवरही होणार आहे. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, काकड आरती, कीर्तन, जत्रा, तमाशा, जागरण गोंधळ आदी कार्यक्रमांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे ज्यांना भोंगे वाजवयाचे आहे त्यांनी पोलीस परवानगी घेऊन ठराविक वेळेत त्याचे पालन करावे त्यापेक्षा वेगळी भूमिका कोणी घेऊ नये.
दरम्यान, गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेवर जातीयवादाचा आरोप केला परंतु शरद पवार मागील ५० वर्षे राजकारणात सक्रिय असून केंद्र व राज्याने त्यांचे राजकारण, समाजकारण पाहिलेले आहे. सर्व जातीधर्माला एकत्रित घेऊन वाटचाल करण्याचे काम त्यांनी केले असून त्यांचेवर जातीयवादाचा आरोप करण्याशिवाय ठाकरेंकडे दुसरा कोणता कार्यक्रम नाही. महाराष्ट्रात विविध प्रश्न परंतु त्याबाबत ते चर्चा करत नाही, केवळ मला राज्यातील प्रश्न माहिती असे सांगत वरवरची मलमपट्टी करण्याचे काम करतात. त्यामुळे पवारांवरील त्यांच्या टिकेला आपण महत्व देत नाही.
भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर टिका करत असून मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करत असल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळत आहे. दोघांनी आपआपल्या भूमिका वाटून घेतल्या असून दोघे एकत्रित येऊन राज्यातील वातावरण गढळू करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात अशांतता निर्माण करुन राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे असे चित्र त्यांना निर्माण करावयाचे आहे. या पाठीमागे जाणीवपूर्वक कोणीतरी ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे. जेम्स लेनचा जुना मुद्दा पुन्हा तापवण्याची गरज नाही. देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे मात्र त्याबाबत राज ठाकरे बोलत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला.