महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने रविवारी राज्य शिक्षक मेळावा व परिषदेचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने येत्या रविवारी २६ डिसेंबरला ११ वा. आळंदी देवाची येथील न्यू इंद्रायणी गार्डन मंगल कार्यालयात राज्य शिक्षक मेळावा व परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह विविध प्रश्नांवर सविस्तर ऊहापोह करण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे व महासचिव विठ्ठल सावंत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड असतील. ‘ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण व करावयाच्या उपाययोजना’ यावर दिगंबर काळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, त्यात श्रीमंत कोकाटे, मतीन भोसले, विकास शेलार आदी सहभागी होतील.

शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, शिक्षण सेवकांचे मानधन सहा हजारावरून २५ हजार रुपये इतके करावे, पदोन्नती तातडीने करतानाच पदोन्नतीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे लागू करावे, त्याकरिता निष्णात वकिलाची नेमणूक करण्यात यावी, संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण कालावधी डिसेंबर २०२२ पर्यंत करावा, सर्व शिक्षा अंतर्गत असणारे कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम करावेत, शिक्षकांना गृह विभागाप्रमाणे कॅशलेस विमा लागू करावा, दहा लाख रुपयापर्यंतची वैद्यकीय बिले जिल्हा परिषद स्तरावर मंजूर करण्याची परवानगी द्यावी, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५०  लाख विमा रक्कम देऊन कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी द्यावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे तो लागू करावा, निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करून शिक्षकांना त्याचा लाभ द्यावा, सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना त्वरित त्यांची हक्काची रक्कम व पेन्शन आदेश त्याच दिवशी मिळावा, खासगी शाळेतील शिक्षकांच्या बदलीचे अधिकार शासनाकडे घ्याव्यात, यांसह शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. या वेळी राज्यस्तरीय पुरस्कारांचेही वितरण होणार आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *