भारतीय पारंपरिक ज्ञानपरंपरेच्या जागतिकीकरणासाठी आयसीसीआर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राबविणार महत्त्वाकांक्षी UTIKS प्रकल्प


पुणे- भारतात अनेकविध प्रकार आणि विषयांमधील पारंपरिक ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. याच परंपरा जगभरातील नागरिकांबरोबरच जास्तीतजास्त भारतातील नागरिकांपर्यंत देखील पोहोचाव्यात, त्यांची या परंपरांशी किमान तोंडओळख व्हावी, या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्या वतीने युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स अर्थात ‘युटिक्स’ (UTIKS) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संबंधी आज आयसीसीआर आणि पुणे विद्यापीठ यांमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या फायनान्स कमिटीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एनटरप्रायझेस विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, उपक्रमाचे कंटेन्ट डिरेक्टर श्रीरंग गोडबोले, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागाचे संचालक एन. के. मालिक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूपाल पटवर्धन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.   

अधिक वाचा  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल-राजेश पांडे

यावेळी बोलताना सहस्त्रबुद्धे म्हणाले, “जगभरात आर्थिक, सामरिक विषयांवर चर्चा करण्यासाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत, मात्र बहुसंख्य जागतिक प्रश्न हे संस्कृतीशी संबंधित असले तरी त्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही. हेच लक्षात घेत आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत ‘युटिक्स’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे भारतीय पारंपरिक ज्ञानाबद्दल जगाची साक्षरता वाढवणे, याबद्दल असलेल्या गूढ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्याविषयीची योग्य माहिती पोहोचविणे, रूढ असलेले अपप्रचार, गैरसमज दूर करण्यासाठी एकाच दिशेने यशस्वी प्रयत्न करणे हा माचा या मागील उद्देश आहे. याद्वारे भारतीय पारंपरिक ज्ञानाचा इंटरनेटच्या माध्यमातून प्रसार होईल असा आमचा विश्वास आहे. ”

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “केवळ उपलब्ध माहिती न देता भारतीय पारंपरिक ज्ञानाचे आजच्या काळाच्या दृष्टीने आकलन व्हावे यासाठी आम्ही युटिक्सच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार आहोत. भारतीय संस्कृतीकी जतन करण्याबरोबरच नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यामध्ये हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.”   

अधिक वाचा  शैक्षणिक प्रश्नांसाठी उद्या शाळा बंद आंदोलन : मुख्याध्यापक महामंडळासह अन्य संघटनांचा इशारा

भारतीय पारंपारिक ज्ञानाबद्दल जगभर उत्सुकता आहे. हेच लक्षात घेत भारतीय ज्ञानाच्या प्रसारासाठी एकत्रितपणे प्रभावी पाऊल उचलले जावे, या दृष्टीने युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स अर्थात ‘युटिक्स’ (UTIKS) या उपक्रमाला सुरुवात होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या ई कंटेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटर (e – CDLIC) च्या माध्यमातून सदर उपक्रमाची निर्मिती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. e – CDLIC सेंटरला  अशा स्वरूपाचे ई कॉन्टेंट विकसित करण्याचा मोठा अनुभव आहे. आजवर सेंटरने १३०० हून अधिक व्हिडीओचा अंतर्भाव असलेले अभ्यासक्रम विकसित केले आहेत. विद्यापीठातील विविध विभाग आणि विद्यापीठाशी संलग्न संस्थांकडे असलेले ज्ञान आणि अनुभव या उपक्रमाच्या निर्मितीत महत्वाचे घटक असणार आहेत.

येत्या १३ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर सदर प्रकल्प कार्यान्वित होणार असून यावेळी भारतीय संविधान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भरतशास्त्र, अष्टनायिका, मोहिनीअट्ट्म, कलरीपट्टू, रॉबिन्दो संगीत, जत्रा, बिर्याणी, भारतीय शिष्टाचार, भारतीय लग्नसंस्था, योगासने, आयुर्वेद, प्राचीन भारतातील ज्ञानमहर्षी, बॉलिवूड नृत्य आणि त्याची शास्त्रीय नृत्यापर्यंतची मूळे , शास्त्रीय संगीतातील घराणी, भारतीय तालवाद्ये, मराठ्यांची शस्त्रे आणि युद्धनीती या विषयांचे १५ कॅपसुल्स पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता सहावी 'युवा संसद' पुण्यात : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुुणे तर्फे आयोजन

कला- संस्कृती, भारतीय महाकाव्य, भारतीय वन्य जीवन, मंदिरांचे वास्तुशास्त्र, लोककला व संस्कृती, योग, भारतीय पाककला, पारंपारिक नृत्यप्रकार यांसारख्या १०० विषयांवर अत्यंत साध्या, सोप्या आणि सर्वांना समजेल अशा ई कॉन्टेंट कॅपसुल्सच्या रुपात ही माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये प्रेझेंटेशन, व्हिडीओ, वाचण्यासाठी आवश्यक माहिती, क्विझ आदी बाबींचा समावेश असेल. किमान दोन तासाचे हे कॅपसुल्स सध्या इंग्रजी भाषेत तर नजीकच्या भविष्यात जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी आणि चीनी भाषेत उपलब्ध होतील. ज्यांना आपल्या आवडीच्या विषयात अधिक माहिती हवी असेल, त्यांना ती कुठे मिळू शकेल याची देखील माहिती या ई कॉन्टेंट कॅपसुल्स (कोषिका) मध्ये देण्यात येणार आहे हे विशेष. हा उपक्रम सर्वांसाठी  पूर्णतः विनामूल्य असेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love