पुणे(प्रतिनिधि)- सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) ला नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) 2024 मध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे. हे प्रतिष्ठित रँकिंग 12 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात प्रसिध्द करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात इंडिया रँकिंग 2024 चे अनावरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षण सचिव के.संजय मुर्थी,युजीसी अध्यक्ष प्रा.एम.जगदेश कुमार ,एआयसीटीई चे अध्यक्ष प्रा.टीजी सीताराम,एनईटीएफचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुध्दे,एनबीए सदस्य सचिव डॉ.अनिलकुमार नासा,उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव सुनील कुमार बर्नवाल,सहसचिव श्री.गोविंद जैसवाल व शिक्षण क्षेत्रातील इतर दिग्गज मंडळी आणि संस्था प्रमुख उपस्थित होते.
एनआयआरएफ हे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 मधील एक महत्त्वाचा भाग असून या रँकिंग्समध्ये अध्यापन,अभिनवता,संशोधन, पदवीचे निकाल इत्यादी महत्त्वाच्या बाबींमध्ये उत्कृष्टता दर्शविणाऱ्या सर्वोच्च संस्थांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच एनआयआरएफ रँकिंगमध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणी सादर करण्यात आली आणि या नव्याने सुरू झालेल्या श्रेणीत सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ने पहिले स्थान मिळविले आहे.
सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार म्हणाल्या की, मा.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने हा प्रतिष्ठित सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. हे यश आमचे विद्यार्थी,प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासह विद्यापीठाशी संबंधित प्रत्येकाचे कठोर परिश्रम आणि समर्पण दर्शवितो. आम्हाला हा सन्मान मिळाल्याचा अभिमान आहे आणि या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करते.
सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठांचे भविष्यातील विद्यापीठ म्हणून हे आहे वेगळेपण
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून प्रगतीशील बदल सादर झाले आहेत.केवळ पाठांतराच्या पलीकडे जाऊन अनुभवात्मक शिक्षण,सर्जनशीलतेवर भर देण्यात आला आहे. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत राहत भारतात कौशल्य आधारित शिक्षण प्रदान करण्यात अग्रगण्य आहे.
शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यातील दरी भरून काढणे
भारतात सुशिक्षित तरूणांची संख्या अधिक आहे,मात्र योग्य कौशल्याच्या अभावामुळे उपयुक्त रोजगार संधी मिळविण्यासाठी अनेक युवकांना संघर्ष करावा लागत आहे. ही असमानता लक्षात घेता,कौशल्य-आधारित शिक्षणाचा समावेश करण्यासाठी उच्च शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यावर भर दिला जात आहे.
आमचे विद्यापीठ अत्याधुनिक कॅम्पस,उच्च कुशल प्राध्यापक,उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त अभ्यासक्रम,अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण उपकरणे आणि यंत्रांचा समावेश असलेल्या विशेष प्रयोगशाळांसह विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान केले जाते. विद्यार्थ्यांच्या उद्येोजकीय क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात इनोव्हेशन आणि स्टार्टअप सेंटर सुरू करण्यात आले आहे.
उद्योग संरेखित कार्यक्रम
कौशल्य विद्यापीठे ही भारतातील उच्च शिक्षणाच्या भविष्याचे प्रतीक आहेत. हे शिक्षणाचे एक मुलत: अनोखे प्रारूप आहे,जे विद्यार्थी केंद्रित व उद्योग आणि व्यावसायिक गरजांशी जुळवून घेणारे आहे. विद्यापीठ गतिशील शिक्षण अध्यापनशास्त्र आणि अनुभवात्मक शिक्षण प्रदान करते. हे केवळ उद्योगाशीच नाही तर समुदाय आणि सर्व भागधारकांशीही दृढ संबंध स्थापित करते.
भविष्यकेंद्रित कार्यक्रम आणि गतिशील अभ्यासक्रम
ऑटोमोबाईल,ईव्ही,मेकॅट्रॉनिक,एआय,एमएल,डेटा सायन्सेस,सायबर सिक्युरिटी,आयटी,बीएफएसआय,कन्स्ट्रक्शन,सस्टेनेबिलिटी,लॉजिस्टिक्स ॲन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट,आर्किटेक्चर,रिटेल,पोर्टस ॲन्ड टर्मिनल मॅनेजमेंट,ब्युटी ॲन्ड वेलनेस आणि डिजिटल मिडिया ॲन्ड मार्केटिंग यासारखे गतिशील विकास क्षेत्रातील अभ्यासक्रम विद्यापीठाद्वारे प्रदान केले जातात. एसएसपीयू पदवी प्रदान करण्याबरोबरच सर्व स्तरांवर प्रमाणपत्र देखील प्रदान करते. या विद्यापीठातर्फे प्रदान केली जाणारी शिक्षण पध्दती ही परिवर्तनशील आणि जुळवून घेण्यायोग्य आहे, जी विविध सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक आणि वयोगटातील विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करते. याचा उद्देश्य हा केवळ विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तयार करणे नसून उद्योजकता आणि अभिनवतेच्या क्षमतेला चालना देणे हा आहे. विद्यापीठाने 12 हून अधिक विदेशी विद्यापीठांसोबत सहयोग केला असून यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ निर्माण करणारी संस्था
शिक्षणासाठी परिवर्तनशील दृष्टीकोनासह एसएसपीयू उद्योग संबंधित कौशल्यांसह विद्यार्थ्यांना कुशल प्रशिक्षण प्रदान करून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असे कार्यबल विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. शिक्षण आणि नोकरी यातील अंतर कमी करून कामाच्या ठिकाणी विकसित होत असलेल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकणारे कर्मचारी वर्ग घडविण्यामध्ये विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावते.