सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम

Uncategorized
Spread the love

पुणे- लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्क ची निर्मिती करण्यात आली असून आता गणिताची गोडी लागावी यासाठी विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७३ व प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, इनोव्हेशन केंद्राच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ.नितीन करमळकर म्हणाले, इयत्ता चौथीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या गणित म्युजियम खेळाच्या माध्यमातून गणित विषय शिकवण्यात येईल. ही संकल्पना पंतप्रधान कार्यालयातून आली असून यासाठी भारत फोर्ज कंपनीचे बाबा कल्याणी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

कोव्हिड काळात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रांचे आम्ही सकाळच्या वेळात विद्यापीठ परिसरात प्रदर्शन भरविले. विद्यापीठात सकाळच्या वेळात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.

विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील असून त्यासाठी सीफोरआयफोर प्रयोगशाळा, रिसर्च पार्क फाउंडेशन, सायन्स पार्क, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असे अनेक उपक्रम सातत्याने करत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच प्र कुलगुरू व कुलसचिव यांचं मोलाचं योगदान आहे, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.

विविध पुरस्कारांची घोषणा

यावेळी विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीज पद्मश्री विखे पाटील कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या विभागामध्ये डिपार्टमेंट ऑफ ऍटमोस्पेरीक अँड स्पेस सायन्स यांना जाहीर झाले. तर वैयक्तिक पातळीवरील पुरस्कार यावेळी घोषित करण्यात आले.

—-

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *