पुणे(प्रतिनिधि)—राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवाल करीत त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. एकीकडे राज्यातील विविध पक्षाचे नेते राज्यपालांना खडे बोल सुनावत असताना, दुसरीकडे आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांसह सुधांशू त्रिवेदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘विकृती ही विकृती असते, त्याला जात, पात, धर्म नसतो असे ते म्हणाले.
पवार, गडकरींनी त्याचवेळी आक्षेप का घेतला नाही?
राज्यपालांनी हे विधान केले तेव्हा येथे व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला. कोश्यारी यांच्या विधानानंतर आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला का, या प्रश्नाला उत्तर देणं त्यांनी टाळलं
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ‘आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफीनामा लिहून दिला, असे विधान केले होते. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, सुधांशु त्रिवेदी यांनी कोणत्या आधारे शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केलं, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? त्यांना लाज वाटत नाही? शिवाजी महाराजांनी माफीनामा लिहून दिला याला पुरावा काय आहे, असा सवाल त्यांनी केला.
‘जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती’, असंही उदयनराजेंची स्पष्ट केले.
उदयनराजेंनी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची सुद्धा मागणी केली. याबाबतची पुढील भूमिका आपण २८ नोव्हेंबरला स्पष्ट करणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलंय. यापुढे शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास नेस्तनाबूत करू, असा इशाराही उदयनराजेंनी यावेळी दिला.