ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधी सोहळा संपन्न : चार लाख वैष्णवजणांचा आळंदीत हरिनामाचा गजर

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने मंगळवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते. निर्बंधमुक्त हा सोहळा पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण होते असे आनंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. अलंकापुरीमध्ये गुरुवारपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा रंगला. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली. करोनाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर पहिल्यांदाच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा निर्बंधमुक्त पार पडला. गेल्या पाच दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल झाले. ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अलंकापुरी न्हाऊन निघाली.


बुधवारी समाधी सोहळ्याची सुरुवात किर्तनाने झाली. सव्वा बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळी 7 ते 9 या वेळेत हभप हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन संपन्न झाले. सकाळी 7:30 ते 9 :30 वीणा मंडप कीर्तन संपन्न झाले.भोजलिंग काका मंडप येथे 7 ते 9 कीर्तन संपन्न झाले. सकाळी 9 ते 10 यावेळी महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर हभप हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षणा घातली. 9 ते 11 कीर्तन भोजलिंग काका मंडप व माऊली मंदिरात स.10 ते दु.12 यावेळेत हभप रामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन संपन्न झाले. यानिमित्ताने मंदिरात सुंदर माऊलींची रांगोळी काढण्यात आली. माऊली मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. दुपारी बारा ते साडे बारा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा निमित्त घंटानाद त्यानंतर संजीवन समाधी वर पुष्पवृष्टी करण्यात आली व उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद दिला अशा प्रकारे हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे यांनी दिली आहे.

————————————————————————————————

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे असे साकडे माऊली चरणी आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी घातले आहे. अवघ्या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी हाच खरा वारकरी असून त्याची शेती सुजलाम सुफलाम होवो अशी अपेक्षा देखील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुपार बारानंतर वारकरी परतीच्या मार्गाला लागतील. माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा वारकाऱ्यांमध्ये नवचेतना आणणारा आहे. या सोहळ्यामुळे अनेक वारकऱ्यांना स्फुर्ती मिळते.
– विकास ढगे विश्वस्त , आळंदी देवस्थान

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *