या आधीच्या कॉंग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर अनेक महान योद्ध्यांचा इतिहास आपल्यापर्यंत कमी प्रमाणात पोहोचविला, अनेकदा पोहोचविलाच नाही अशी उदाहरणे असताना पुण्यात शिवसृष्टी पाहिल्यानंतर अशा प्रकल्पांमधून आपला इतिहास लहान मुलांसोबतच युवा पिढीपर्यंत नेटाने पोहचविता येईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि हैदराबाद येथून असदुद्दिन ओवैसी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविलेल्या माधवी लता यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहणाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात आज गुरुवार दि २० जून, २०२४ रोजी तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधत पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’मध्ये अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच निमित्ताने माधवी लता यांनीही आज शिवसृष्टीला भेट देत उपस्थित शिवप्रेमींशी संवाद साधला. त्या वेळी बोलत होत्या.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनीत कुबेर, महासचिव डॉ. अजित आपटे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, यांसोबतच मनोज पोचट, जयंत पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवसृष्टी येथील विविध विभागांमध्ये असलेली माहिती जाणून घेत शिवसृष्टीचा अनुभव माधवी लता यांनी घेतला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आपल्या महान योद्ध्यांचा इतिहास आपल्याला माहित नाही हे खरेतर आपले दुर्भाग्य आहे असे मला वाटते. आज नव्या पिढीला इतिहास समजावा या उद्देशाने आपण पुस्तके वाचा, लेख वाचा असे सांगितले तर त्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांच्यामध्ये वेगळा उत्साह आणावा लागेल. मात्र शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांमधून अधिक रोचकपणे, नाटक रूपाने हाच इतिहास मांडणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे नव्या पिढीला समजेल, उमजेल अशा पद्धतीने आज पुन्हा एकदा इतिहास नेटाने मांडायला हवा.” देशाच्या उत्तर व दक्षिण भागातील राज्यांमध्ये विविध भाषेत असे प्रयोग करीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वदूर पोहोचवायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले.
शिवछत्रपती हे केवळ महराष्ट्राचे राजे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे उर्जास्थान होते. त्याही वेळी देशाने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आजही घेत आहे आणि या नंतरही ते कायमच प्रेरणास्थानी असतील असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना देशाला दिली. छत्रपती शिवाज महाराज यांच्याशी संबंधित बाबी या केवळ चिन्हे, प्रतीके नसून त्या प्रत्येक गोष्टीमधून आज आपण प्रेरणा घेत आहोत, असे मला वाटते. स्वराज्य उभे करायचे, स्वभाषेचा सन्मान करायचा आणि आत्मसन्मान ठेवत कोणाही समोर झुकायचे नाही, याची शिकवण आपल्याला महाराजांकडून, जिजाऊ बाईसाहेबांकडून मिळाली आहे, आज या शिकवणीवर भर देत आपण युवा आणि स्त्रीयांचे सशक्तीकरण करायला हवे आहे.”
आज मी शिवसृष्टीला भेट दिली आहे, यानंतर महाराजांचे विचार घेऊन मी माझ्या राज्यात जाईल आणि ते तेथे रुजवायचा प्रयत्न करेल. माझ्या तेलंगणा या राज्यातही अनेक मराठी नागरिक आहेत, तेथेही मराठी मंडळ सक्रीय असून या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. परंतु या बरोबरच त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली आणि त्यांचा त्याग समजून घेत त्यांचे गुण जास्तीत जास्त नागरिकांच्या व्यक्तिमत्त्वात रुजविण्याचा मी प्रयत्न करेल, असे माधवी लता म्हणाल्या.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरताना मला जेव्हा हा तर असदुद्दीन ओवैसी यांचा गड आहे, तो तुम्ही कसा भेदणार असा प्रश्न विचारला गेला त्यावर मी म्हणाले की, जर दिल्लीतील औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज स्वत:ची सुटका करून घेऊन स्वराज्याची स्थापना करू शकतात तर काहीही होऊ शकते, अशी आठवण माधवी लता यांनी सांगितली. जिथे साऱ्या शक्यता संपल्या सारख्या वाटतात तिथून शिवरायांसारख्या महापुरुषाच्या चरित्राला सुरुवात होते असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी बोलताना विनीत कुबेर म्हणाले, “आज शिवसृष्टीत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना शिवप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला. सकाळी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. यावेळी पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवराज्याभिषेकावरील व्याख्यान आज दिवसभर शिवसृष्टीत दाखविण्यात आले. याबरोबरच मराठेशाहीतील काही महत्त्वाचे प्रसंग व योद्धे यांच्या विषयी अत्यंत रंजकपणे माहिती सांगणाऱ्या ‘मावळा’ हा वैशिष्ट्यपूर्ण खेळही उपस्थितांसाठी ठेवण्यात आला होता. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम चरणात आले असून येत्या काही महिन्यांमध्ये त्याचे लोकार्पण होऊन शिवभक्तांसाठी तो खुला होईल, अशी माहितीही यावेळी कुबेर यांनी दिली.