पुणे(प्रतिनिधि)–टोकिओ ऑलिंपिंक स्पर्धेत भारताला 7 पदके मिळाली, पॅरालिंपिक्समध्ये, 19 पदके मिळाली, आशियाई स्पर्धेत 107 पदके मिळाली, बमिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत 22 सुवर्ण पदकांसह 61 पदके मिळाली ही गेल्या चाळीस वर्षांतील देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला अच्छे दिन आले असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
मोहोळ म्हणाले, “देशात चांगल्या खेळाडुंची वानवा कधीच नव्हती, मात्र त्यांच्या गुणवत्तेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये कधीच प्रभाव दिसत नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ खेळाडुंशी थेट संवाद साधला, पंतप्रधान थेट तुमच्याशी बोलतात ही भावना खूप महत्त्वाची होती. या चर्चेतून उपाययोजना केल्या, उत्तम खेळाडू शोधले, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले, स्पोर्टस सायन्सला महत्त्व दिले, 15 ऑगस्टला जनपथवर बोलावून सन्मान दिला, यातून खेळाडुंचा आत्मविश्वास वाढला आणि देशात क्रीडा संस्कृती विकसित होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश पाहायला मिळाले.”
मोहोळ पुढे म्हणाले, “भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी मोदींनी खेलो इंडिया ही शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू केली. त्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली जाते. खेलो इंडियाच्या 9 हजार केंद्रांना मान्यता दिली. विविध खेळांसाठी संकुले, प्रशिक्षण केंद्रे आणि 307 क्रीडाविषयक पायाभूत प्रकल्पांना सरकारने मंजुरी दिली. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजने’त खेळाडूंना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्या दहा देशांत भारताने स्थान मिळविण्याचे लक्ष आहे. तब्बल 40 वर्षांनंतर भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारत तयार असल्याची घोषणा भारताने केली आहे. मोदींच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला सुवर्ण काळ येईल असा विश्वास वाटतो.”
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करू
मोहोळ म्हणाले, “पुणे महापालिकेत सत्तेत आल्यावर भाजपने क्रीडा धोरणाला मंजुरी दिली. स्वतंत्र क्रीडा धोरण, क्रीडा नर्सरी, प्रशिक्षण, दत्तक योजना, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती योजना, खेळाडुंना पारितोषिके, सन्मान, अर्थसहाय, नोकरीत संधी, अपघात विमा योजना, स्पर्धेसाठी अर्थसहाय आदी माध्यमांतून शहरात क्रीडा संस्कृतीचा विकास करीत आहोत. मी महापौर असताना शहरातील 255 छत्रपती पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती माझ्या हस्ते देण्यात आली. राज्यातील महायुती सरकारने छत्रपती पुरस्कार आर्थिक रक्कम 50 हजार रुपयांवरून तीन लाखांपर्यंत वाढविली. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती व प्रोत्साहने वाढवली आहेत. 2036 ऑलिंपिक यजमानपदाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शहरामध्ये क्रीडा क्षेत्राचा पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करू.”