मोदींच्या या गोष्टीचे आश्चर्य वाटत नाही – सुप्रिया सुळे

राजकारण
Spread the love

पुणे—उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील शेतकरी महात्मा गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर गाडी चालवण्यात आली. उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अशा गोष्टींवर बोलत नाही. महिलांवर बलात्कार झाला, तेव्हाही ते काही बोलले नाहीत. त्यामुळे मला याचे आश्चर्य वाटत नाही असा उपरोधिक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. दरम्यान, पवार साहेबांनी दिल्लीत जी भूमिका मांडली. तीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, असेही त्या म्हणाल्या.

पुण्यात मुलींची पहिली शाळा ज्या ठिकाणी भरवण्यात आली, त्या भिडेवाड्याला भेट देण्यासाठी सुप्रिया सुळे आज उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी या पाहणी करण्यास जात होत्या.त्यावेळी तेथील पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्व घटनांबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती.

सुळे  म्हणाल्या, पवार साहेबांनी दिल्लीत भूमिका मांडली. तीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. शेतकरी आणि महिलांवर अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी त्याचा निषेध करणारच. अन्यायाच्या विरोधात आम्ही उभे आहोत. शांततेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. तशाच शांततेच्या मार्गाने शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. तसेच अशा घटना घडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच प्रतिक्रिया देत नाहीत. त्यात आश्चर्य काय? असा टोलाही त्यांनी लगावला.

 खानवडीमध्ये आम्ही शाळा काढत आहोत. ज्योतिबा फुलेंचे ते मूळ गाव आहे. तिथे काही दिवसांपूर्वीच जाऊन आले. खानवडीमध्ये शाळा सुरू करावी ही पवार साहेबांची पूर्वीपासूनची इच्छा होती. तोच धागा पकडून ही शाळा सुरू करत आहोत. शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *