दंतकथांना बाबासाहेबांच्या लिखाणात वाव नाही- राज ठाकरे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे— “बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही. अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं. बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा… आमची नातवंड, पतवंडं तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील”, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा गौरव करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पुण्यातील शिवसृष्टीमध्ये आयोजित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘ओंजळ’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.या सोहळ्यास स्वत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण आशा भोसले, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेबांचं सुवासिनींच्या हस्ते 99 दिव्यांनी औक्षण करण्यात आलं.आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला.

राज ठाकरे म्हणाले, “सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. आज बऱ्याच वर्षांनी मी शिवसृष्टीत आलो, इथे दाखल होत असताना मला जुनी शिवसृष्टी आठवली जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर साकारली होती, १९७४ मध्ये त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो. मी रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा राज्यभिषेक सोहळा मी पाहत होतो. पहिल्यांदा त्या शिवसृष्टीत भवानी  तलावर आणली गेली होती आणि बाबासाहेब ती घेऊन आले होते.

त्या भवानी तलावरीचं स्वागत बाळासाहेबांनी त्या वेशीवर केलं होतं, तेव्ही मी देखील तिथे होतो. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवसात राहू शकलो. अनेक गोष्टी शिकू शकलो. त्यावेळी एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबाहेबांनी काम केलं होतं आणि ते मी पाहिलं आहे.” अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

राज ठाकरेंची आशा भोसलेंवर स्तुतीसुमने

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सौदर्याचं वर्णन करताना, “ कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत.. या वयातही काय दिसतात ना.. अशी स्तुतीसुमने उधळली.

लोकांमध्ये आशाताईंच्या सौंदर्याबाबत चर्चा सुरू आहे. कोणीतरी म्हणाले, पंचाहत्तरीतही काय दिसतात ना.. मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसले आहेत.  आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे. याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.

भाषणाची नवी सुरुवात

राज ठाकरे आपल्या भाषणाची नेहेमी सुरुवात, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी करतात. मात्र आज त्यांनी अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, असं म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे एकच हशा पिकला. व्यासपीठावर बहुतांश मान्यवरांनी मास्क घातला नव्हता. मात्र मास्कधारी प्रेक्षकांना संबोधताना राज ठाकरेंनी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशी मार्मिक सुरुवात केली.

एक लाख एक रुपये अर्पण करून आशा भोसले यांची कृतज्ञता

आशा भोसले यांनी देखील 1 लाख 1 रुपये अर्पण करत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता यावेळी व्यक्त केली.

त्या  म्हणाल्या, सर्वत्र कोरोना संसर्गाची दाहकता वाढली आहे. या काळात तब्बल दीड वर्षानंतर मी घराबाहेर पडले आहे. ही कोरोनाची काळ कोठडी आहे. मी आता लोणावळ्यात राहतेय, मुंबईमध्ये नाही. लवकरच परत मुंबईला जाणार आहे. मी भाषण देणारी बाई नाही, आता जी माणसं भाषण देऊन गेली, ती भाषणातील थोर माणसं आहेत. सगळीकडे उभं राहून ते भाषण देऊ शकतात. विविध लेखकांची नावे घेऊन त्या सर्व मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं असे त्या म्हणाल्या. तुमच्या चरणावर 1 लाख 1 रुपये अर्पण करते, असे म्हणत  त्यांनी बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *