पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.
पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते .चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के मतदान झाले होते.
पुणे शिक्षक मतदारसंघात सायंकाळी 4 पर्यंत 67 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसनगावकर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जितेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. 2014 ला विजयी झालेले दत्तात्रय सावंत यांनीही निवडणूक लढवली आहे.