पुणे(प्रतिनिधि)—राज्यांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात गेल्या कही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे तर बारे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही पुणेकरांची चिंता मिटलेली नाही कारण सप्टेंबर महिन्यात कोविड-19च्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वर्ष सरताना आणि नवीन वर्षातही पुणेकरांना काळजी घ्यावीच लागणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने ही शक्यता व्यक्त केली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुण्यातील कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनावर तान आला होता. कोरोंनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध न होणे, आयसीयूची कमतरता, ऑक्सीजनची कमतरता, व्हेंटीलेटरची कमतरता यामुळे गोंधळ झाला होता. उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राणही गमवावे लागले होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रनेवरील तानही कमी झाला आहे. रुग्णांची संख्या घटल्याने बेडही सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. प्रमाण कमी झाल्याने जनतेमध्ये थोडा निर्धास्तपणा आला आहे. परंतु, केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे.
डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक नुकतेच पुण्यात आले होते. जम्बो कोविड सेंटरसह बाधित क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचना ही केल्या आहेत. पुढील दीड महिना, म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र, संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता ही वर्तवली आहे.