राज्यपालांच्या वादग्रस्त भूमिकेवर काय म्हणतायेत घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ?

राजकारण
Spread the love

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातील मंदिरे उघडी करावीत अशी मागणी करणारे पत्र लिहिले. पत्रामध्ये मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे असे राज्यपालांनी पत्रात म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हटले होते. त्यावरून निर्माण झालेला राजकीय वादंग आणि आरोप-प्रत्यारोप याने राज्यातीलच नव्हे देशातील राजकारण ढवळून निघाले. राज्यपालांनी केले ते योग्य के आयोग्य याबाबत बोलताना घटना तज्ञांनी व कायदे तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त भूमिकेवर काय म्हणतायेत घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ

राज्यपालांनी सर्व धर्माची प्रार्थना स्थळे सुरू करावी, अशी भूमिका त्यांनी घ्यायला हवी होती. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने हिंदुत्व, हिंदुत्व करू नये, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले . तर, राज्यपालांनी पंचाची भूमिका घ्यायला हवी.. भाजपचे प्रतिनिधी असल्यासारखे राज्यपाल कोश्यारी वागत आहेत असे मत घटना तज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, राज्यपालांनी त्रयस्थाची भूमिका बजवावी आणि त्यांनी तटस्थ राहायला हवे असे मत कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

गोडबोले म्हणाले, एखाद्या धर्माच्या प्रार्थना स्थळाबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे योग्य नाही. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करायला हवी होती. त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यास हरकत नाही. मात्र अशा प्रकारे लेखी मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे.

उल्हास बापट म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राजकीय आघाडी उघडली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. याचा कोश्यारी यांना विसर पडला असल्यासारखे वाटते. राज्यघटनेत राज्यपाल यांना विशेष अधिकार दिले आहेत. त्यांना प्रश्न विचारण्याच्या अधिकार असून, ते मुख्यमंत्र्यांना माहिती विचारू शकतात. मात्र, अशा प्रकारी भूमिका घेणे योग्य नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी अशी पत्रे एकमेकांना पाठवणे चुकीचे आहे. राज्यपालांनी पंचाची भूमिका घ्यायला हवी.

असीम सरोदे म्हणाले, राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम काम करावे, असे संकेत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वेळोवेळी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत आहे. हे चुकीचे आहे. राज्यपालांच्या अशा भूमिकांमुळे वेगळा पायंडा पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. कोश्यारी हे एका पक्षाचे प्रतिनिधी असल्यासारखे ते वागत आहेत. एखाद्या विशिष्ट धर्माची प्रार्थना स्थळे सुरू करावी, अशी मागणी राज्यपालांनी करणे चुकीचे आहे. यामुळे एक चुकीचा पायंडा पडेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *